आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ अतिरेकी संघटनांवर बंदी, पाकचा बडगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - २६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या जमात-उद-दवा संघटनेसह १२ अतिरेकी संघटनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाकिस्तान सरकारच्या विचाराधीन आहे. पेशावरमधील लष्करी शाळेवरील हल्ल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
अमेरिकेने फरार तेहरिक ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्लाह फझलुल्लाह याला विशेष (स्पेशली डेसिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट) म्हणून जाहीर केल्याच्या दुस-या दिवशी सरकारने हे संकेत दिले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून आले आहे. यावर सरकारकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही; परंतु नजीकच्या काही दिवसांत त्याची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येते.
अमेरिकेने पाकिस्तानवर सातत्याने दबाव वाढवलेला आहे. पेशावरमधील हल्ल्यानंतर सरकारने धडा घेतला आहे. त्यामुळेच गेल्या जूनपासून दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवायांत वाढ करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळेच एरवी सरकारच्या धोरणांना सातत्याने विरोध करणा-या विरोधी पक्षाने अतिरेक्यांच्या विरोधातील कृती आराखड्याला मात्र आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास त्याचे भारत, काबूलसह अमेरिकेकडून स्वागतच होईल.

बंदी असलेल्या संघटनांची संख्या ७२ वर पोहोचली
केरींच्या दौ-याअगोदर संघटनांवर बंदी
अमेरिकेने दबाव वाढवताना परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांना पाकिस्तान दौ-यावर पाठवले होते. केरी येण्याच्या एक दिवस अगोदर पाकिस्तानने १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घातली. आता आणखी संघटनांवरील बंदीमुळे ही संख्या ७२ वर पोहोचली आहे.

‘लष्कर’ची संघटना
मुंबईवर हल्ला करणा-या जमात-उद-दवा संघटना लष्कर-ए-तोयबासाठी काम करणारी संघटना असून २००८ मधील हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे हक्कानी नेटवर्कचेही पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्या काही भागात वर्चस्व आहे. त्यात काबूलमध्ये या संघटनेने २०११ मध्ये अमेरिकी दूतावासाजवळ हल्ला केला होता. त्यात ५८ जणांचा मृत्यू झाला होता.

सहा प्रकरणे लष्करी कोर्टाकडे वळवली
दहशतवादाशी संबंधित प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा यासाठी पाकिस्तानने सहा प्रकरणे अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या विशेष कोर्टात दाखल करण्याचा निर्णय घेतला. इस्लामाबादच्या मुख्य आयुक्तांनी स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीने सहा प्रकरणांची यादी तयार केली असून ती लष्करी कोर्टाकडे पाठवण्याची शिफारस केली आहे.

भारताचा दबाव
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या संघटनेसह अनेक दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारताकडून सातत्याने होत होती; परंतु त्याला पाकिस्तानने दाद दिली नव्हती; परंतु पेशावरच्या लष्करी शाळेत झालेल्या हल्ल्यानंतर मात्र पाकिस्तानने आपल्या भूमिकेत बदल केला. भारतासह अमेरिकेने त्यानंतर दबाव वाढवला. अखेर पाकिस्तानी सरकारला अतिरेक्यांच्या विरोधात कारवाईचा विचार करावा लागला.