आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबियात 1200 कैद्यांचे तुरुंग फोडून पलायन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगाझी - लिबियाच्या पूर्वेकडील शहरातील तुरुंगातून 1200 कैद्यांनी पलायन केल्याची घटना रविवारी घडली. बेंगाझी शहरातील तुरुंगात अगोदर कैद्यांनी प्रचंड प्रमाणात धुडगूस घालून तोडफोड केली. त्या वेळी झालेल्या दंगलीनंतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगणारे कैदी फरार झाले. तुरुंगफोडीची ही देशातील सर्वात मोठी घटना आहे.
अल-कुफिया तुरुंगातील ही घटना आहे. तुरुंगात कैद्यांचा धुडगूस सुरू असताना त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी मात्र तुरुंग प्रशासनाकडून फारसे गंभीर प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाहीत. कैद्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार केला जाऊ नये, असे आदेश देण्यात आल्याने तुरुंग अधिकारी काही करू शकले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तुरुंगाच्या भिंतीला भगदाड पाडून काही कैदी पळून गेले. काही कैद्यांनी जाळपोळ करून पळ काढला. पंतप्रधान अली झेदान यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. कैदी पळून जाण्यात तुरुंग परिसरातील नागरिकांची मदत झाल्याचे दिसून येते. कारण तुरुंगात दंगल सुरू असताना बाहेरून नागरिकांनी या तुरुंगावर जोरदार हल्लाबोल केला होता. नागरी वस्तीमध्ये तुरुंग नसावा, असे येथील रहिवाशांना वाटत होते. त्यांची ही अनेक दिवसांची मागणी होती. परंतु त्याला प्रशासनाकडून दाद दिली जात नव्हती. त्यामुळे त्यांनी तुरुंगावर हल्ला केला. या गोंधळाचा कैद्यांनी फायदा उचलून पोबारा केल्याचे पंतप्रधान झेदान म्हणाले. पूर्वेकडील भागात काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्रिपोली, बेंगाझी भागातील नागरिकांनी जोरदार निदर्शने केली होती. मुस्लिम ब्रदरहुडमुळे देशातील अनेक भागांत हिंसाचार घडून आल्याचा आरोप करत नागरिक रस्त्यावर उतरले होते.


‘ब्रदरहुड’विरोधात असंतोष
देशातील हुकूमशाही जाऊन मुस्लिम ब्रदरहुडच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. हे सरकार मुस्लिम कट्टरवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे, असा आरोप बेंगाझीसह देशातील तरुण वर्गाकडून होत आहे. त्याचे तीव्र पडसाद बेंगाझी शहराने अलीकडेच अनुभवले होते. तरुणांच्या गटाने काही दिवसांपूर्वी शहरात जोरदार निदर्शने केली होती. त्यात ब्रदरहुडचा निषेध करणा-या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर राष्ट्रीय आघाडी दलाच्या (एनएफए) कार्यालयावरही मोर्चा नेण्यात आला होता. यातूनच सरकारविरोधी घटकांना मदत केली जात असावी, असा अंदाज आहे.


बाहेरून मदत ?
तुरुंगातून कैद्यांना फरार होण्यासाठी बाहेरून काही मदत मिळाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु सरकारी पातळीवरून याबाबत अद्याप काहीही स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.


आफ्रिकन कैद्यांचाही समावेश
अल-कुफिया तुरुंगातून पलायन करण्यात यशस्वी ठरलेल्या कैद्यांमध्ये लिबियासह दक्षिण आफ्रिकन देशातील कैद्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर यातील काही कैदी गद्दाफी गटाचेदेखील होते.
इजिप्तची सीमा बंद लिबियाच्या शेजारी असलेल्या इजिप्तची सीमा बंद करण्यात आली आहे. या भागातील लष्करी चौक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुरुंगातून फरार झालेल्या कैद्यांना देश सोडून परदेशात जाता येणार नाही.