आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 152 Soldiers Hanging Death Penalty In Bangladesh

बांगलादेशात 152 जवानांना फाशी;जगातील सर्वात मोठा गुन्हेगारी खटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ढाका- सन 2009 मध्ये सरकारविरोधात बंड करणार्‍या 152 निमलष्करी अधिकारी व सैनिकांना बांगलादेशी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या बंडाचा म्होरक्या आणि तत्कालीन ‘बांगलादेशी रायफल्स’ (बीडीआर) या निमलष्करी दलाच्या उपसहायक संचालकाचाही फाशी दिलेल्या सैनिकांमध्ये समावेश आहे. बीडीआरच्या 57 युनिट्समधील सैनिकांनी सरकारविरोधात बंड केले होते. हा जगातील सर्वात मोठा गुन्हेगारी खटला होता.

ढाका महानगर सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयासमोर 820 निमलष्करी जवान आणि 26 नागरिकांविरोधात हा खटला होता. न्यायधीश महंमद अख्तरुझमान यांनी 152 सैनिकांना फाशी ठोठावून 158 जवानांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 251 जवानांना 3 ते 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून 271 जणांना मुक्त करण्यात आले आहे. तत्कालीन बांगलादेश रायफल्स या निमलष्करी दलाचा उपसहायक संचालक तौहिद अहमद यालाही फासावर चढवण्यात येणार आहे. तो या बंडामधील एक म्होरक्या होता. कुख्यात ‘बांगलादेश रायफल्स’चे नंतर ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ (बीजीबी) असे नामकरण करण्यात आले. या अभूतपूर्व खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात प्रचंड गर्दी उसळली होती. सर्व बंडखोरांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, असे न्यायधीशांनी जाहीर करताच न्यायालयात भयाण शांतता पसरली. सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात नेण्यात आले.

57 युनिट्समध्ये हे बंड झाले होते. गतवर्षी 11 निमलष्करी न्यायालयांनी 57 युनिट्समधील 6 हजार 11 बंडखोर सैनिकांना बीडीआर कायद्यानुसार सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.

27 बचाव पक्षाचे साक्षीदार
20 ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण
1300 साक्षीदार
655 सरकारी वकील


मदरशाच्या परिसरात न्यायालय
खटल्यासाठी ढाक्यातील एका जुन्या मदरशाच्या विस्तीर्ण मैदानावर तात्पुरते न्यायालय उभारण्यात आले होते. मध्यवर्ती कारागृहातून सर्व बंडखोर सैनिकांना बेड्या घालून बंद गाडीत न्यायालयात आणण्यात आले. एका मोठय़ा बराकीत त्यांना उभे करण्यात आले होते. न्यायालयाभोवती निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दोन दिवसांचे बंड, 74 बळी
पंतप्रधान शेख हसिना सत्तारूढ झाल्यानंतर दोनच महिन्यांनी बांगलादेश रायफल्सच्या जवानांनी 25 व 26 फेब्रुवारी 2009 रोजी पगार आणि इतर मागण्यांसाठी सरकारविरोधात बंड केले होते. दोन दिवसांच्या या बंडामध्ये बंडखोर जवानांनी बांगलादेश रायफल्सचे (बीडीआर) प्रमुख मेजर जनरल शकील अहमद यांच्यासह 74 लोक ांचे बळी घेतले होते.

राजकीय नेत्यांची फूस
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे संसद सदस्य नसिरुद्दीन अहमद पिंटू, आवामी लीग नेते तोराब अली या दोन राजकीय नेत्यांची बंडाला फूस होती. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

कुटुंबीयांना न्याय मिळाला
बंडामध्ये ठार झालेल्या जवानांच्या नातेवाइकांना व सहकारी गमावलेल्या आमच्यासारख्या अधिकार्‍यांना न्याय मिळाला.
-मेजर जनरल अझीझ अहमद, बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) प्रमुख

33 तासांचे थरारनाट्य
सुमारे 33 तास चाललेल्या या थरारनाट्यात बंडखोरांनी अक्षरश: वेचून वेचून अधिकारी ठार मारले. ढाका सेक्टरचे प्रमुख कर्नल मोजिबुल हक यांच्यासह अधिकार्‍यांची हत्या करून त्यांचे मृतदेहही नाल्यात फेकण्यात आले. सत्तारूढ हसिना सरकारसमोरील हे सर्वात मोठे आव्हान होते.

मृतदेह नाल्यात फेकले, पुरून टाकले
सैनिकांचे हे बंड अल्पावधीत देशभरात पसरले. निमलष्कराचे जवान आपल्या कमांडर्सना धडाधड गोळ्या घालत सुटले. काहींना फासावर चढवले, तर काहींचा छळ करून त्यांना ठार मारले. मारलेल्या अनेक अधिकार्‍यांचे मृतदेह नाल्यात फेकण्यात आले अथवा गाडण्यात आले. संपूर्ण देशभरात प्रचंड घबराट उडाली. बीडीआरच्या इतर अधिकारी, जवानांच्या नातेवाइकांना धमकावण्यात आले.

सामूहिक कबरीचे खोदकाम करताना बांगलादेशचे अग्निशमन दलाचे जवान. 28 फेब्रुवारी 2009 मध्ये बांगलादेश रायफल्सच्या ढाक्यातील मुख्यालयात हे छायाचित्र काढण्यात आले होते.

>पगार व इतर मागण्यांमुळे खदखदत असलेल्या असंतोषाला 25 फेब्रुवारी रोजी वाट मिळाली. बीडीआरच्या मुख्यालयात उच्च्पदस्थ अधिकार्‍यांची बैठक सुरू असतानाच मुख्यालयावर बंडखोर सैनिकांनी हल्ला केला. मुख्यालयातील 2500 शस्त्रे पळवून थेट कार्यालयात घुसले. अधिकार्‍यांना अगदी जवळून त्यांनी धडाधड गोळ्या मारल्या.