आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 12 Attacks : Pakistan Continue Her Excecution Policy

१६/१२ हल्ल्याचे पडसाद: पाकमध्ये दहशतवादाच्या प्रकरणात फाशी कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - १६ / १२ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील चित्र बदलू लागले असून यापुढे दहशतवादाशी संबंधित प्रकरणात दोषीला फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००८ पासून शिक्षेवर स्थगिती होती; परंतु ही स्थगिती उठवण्यात आल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जाहीर केले. पेशावरच्या लष्करी शाळेत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात १४१ चिमुरड्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यानंतर शरीफ यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, देश शोकसागरात बुडाला असून बुधवारी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालिबानच्या हल्ल्यानंतर शरीफ यांनी येथे बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी ही माहिती दिली. मंगळवारची घटना अत्यंत निर्घृण आहे. हल्ल्यातील मुलांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. पाकिस्तानमधून दहशतवादाचे उच्चाटन व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे, असे शरीफ उपस्थितांना म्हणाले. पाकिस्तानमध्ये फाशीच्या शिक्षेवर २००८ पासून बंदी आहे. जूनमध्ये सत्तेवर आल्यानंतर शरीफ यांनी निर्णय बदलण्याचे ठरवले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांना तो घेता आला नाही. साधारण १५० देशांनी मृत्युदंड अथवा फाशीची शिक्षा न देण्यावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानमध्ये नवा नियम अस्तित्वात आल्यास युरोपीय संघासोबतच्या करारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाक गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फाशीची झालेल्या ८००० कैद्यांपैकी १० टक्के अतिरेकी आहेत . सरकारने नव्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर संबंधित दोषींना फासावर लटकवण्यात येईल. दरम्यान, बुधवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दहशतवादमुक्त पाकिस्तानची हाक
शरीफ यांनी यानिमित्त सर्व नेत्यांना दहशतवादमुक्त पाकिस्तान करण्याचे आवाहन केले. केवळ पाकिस्तान व अफगाणिस्तान नव्हे, तर संपूर्ण उपखंडातून दहशतवादाचा नायनाट करणे आवश्यक आहे. निरपराध मुलांच्या छाती, तोंडावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांचे दृश्य विसरू शकत नाही, असे शरीफ म्हणाले. दहशतवादाचा संयुक्त मुकाबला करण्यासाठी शरीफ यांनी मंगळवारी रात्री अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी क्षेत्रात कारवाई करण्यावर सहमती दर्शवली.

फजलुल्हाच्या प्रत्यार्पणासाठी लष्करप्रमुख अफगाणमध्ये : लष्करप्रमुख राहिल शरीफ तालिबान नेता मुल्ला फजलुल्हाच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यासाठी मंगळवारी अफगाणिस्तान दौ-यावर गेले. १६/१२च्या हल्ल्याची जबाबदारी फजलुल्हाने घेतली आहे. शरीफ व घनी यांच्यातील चर्चेनंतर राहिल शरीफ तातडीने अफगाण दौ-यावर गेले आहेत. यासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राहिल अफगाणिस्तानला गेले असल्याची माहिती शरीफ यांनी बैठकीत दिली.