आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुर्सी यांच्या समर्थकांवर लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 200 जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांच्या समर्थकांवर लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 200 वर नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा मुस्लिम ब्रदरहुड संघटनेकडून करण्यात आला.


शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या आंदोलनावर शनिवारी पहाटे गोळीबार झाला. तीन तास चाललेल्या या अमानुष गोळीबारामध्ये 170 वर नागरिक ठार झाल्याचे शनिवारी सांगण्यात येत होते. परंतु हा आकडा अधिक झाल्याचे मुस्लिम ब्रदरहुड संघटनेचे म्हणणे आहे. जखमींची संख्या 5 हजारांवर पोहोचली आहे. देशाचे आरोग्यमंत्री मात्र मृतांचा आकडा 80 असल्याचे सांगतात. 61 वर्षीय मुर्सी यांना झालेल्या विरोधानंतर 3 जुलै रोजी ते पायउतार झाले होते. त्यानंतर लष्कराने त्यांना तळघरात आपल्या निगराणीखाली ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत संताप आहे. त्यांची सुटका करण्याची मागणी करत समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन केले. त्याला सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळू लागला असून शनिवारी लाखो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऐतिहासिक तहरीर चौकात दुपारनंतर मोठ्या संख्येने लोक जमले होते. अजूनही देशात आंदोलन सुरूच आहे.


शांतता ठेवा-अमेरिका
देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, कॅनडाने इजिप्तचे उपाध्यक्ष मोहंमद अल बारादेई यांना देशात शांती निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी इजिप्तमध्ये 120 जणांचा मृत्यू झाला होता. हिंसाचारामुळे प्रदेशातील शांततेवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन देशांत शांततेसाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघानेही सरकारला अशीच सूचना केली आहे.