लाहोर/ नवी दिल्ली - दोन दिवसांपूर्वी पेशावरमध्ये झालेल्या निर्घृण बालसंहाराने हादरल्यामुळे दहशतवादाच्या बीमोडाची भाषा करणा-या पाकिस्तानने
आपले खरे रंग दाखवून दिले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अतिरेक्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा केल्याच्या दुस-याच दिवशी मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकी उर रहमान लख्वीला रावळपिंडी न्यायालयाने गुरुवारी जामिनावर मोकाट सोडून दिले. तो २००९ पासून तुरुंगात होता.
लष्कर- ए- तोएबाचा ऑपरेशन्स कमांडर असलेल्या लख्वीला जामीन देण्याच्या मुद्यांवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानने लख्वीच्या विरोधात नीट युक्तीवाद केला नाही. त्यामुळेच त्याला जामीन मिळाला. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तर ‘हाफिज सईद आणि
दाऊद इब्राहिम या मानवतेच्या शत्रूंना पाकिस्तानने भारताच्या हवाली करावे’, असे संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.
सुनावणीदरम्यान लख्वीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला संघीय तपास संस्थेच्या वकिलांनी केवळ नाममात्र विरोध केला. तोही न्यायालयाने फेटाळून लावला आणि लख्वीची पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले. पेशावरमधील लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यात १३२ निरागस बालकांची हत्या झाल्याच्या दुस-याच दिवशी लख्वीला जामीन देण्यात आला, हे विशेष.
हल्ल्याच्या वेळी देत होता निर्देश
लख्वीवर २६ / ११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यासाठी आलेल्या अतिरेक्यांना प्रशिक्षण देणे आणि हल्ल्याच्या वेळी त्यांना निर्देश दिल्याचा आरोप आहे. जरार साहशी हातमिळवणी करून लख्वीनेच मुंबईवरील हल्ल्याचे कटकारस्थान रचले होते. २६/११ च्या हल्ल्यात १६६ लोकांचा बळी गेला होता.
ठोस पुरावे देऊनही भारताकडे सोपवले नाही : लख्वीविरूद्ध कठोर कारवाई करा किंवा त्याला आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी भारताने पाककडे केली होती. भारताने मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबचा जबाब व अन्य ठोस पुरावेही दिले. मात्र, त्याला सोपवायला पाक तयार झाला नाही.
भारतावर हल्ल्याची शक्यता वाढली
जमात - उद - दावाचा म्होरक्या हाफिज सईदने एक दिवसापूर्वीच पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यास भारताला जबाबदार धरले होते आणि बदला घेण्यासाठी भारतावर हल्ले करण्याची धमकीही दिली होती. लख्वीच्या जामिनही याच घटनाक्रमाशी जोडून पाहिले जात आहे. सूत्रांच्या मते, लष्कर - ए- तोएबा आणि जमात - उद - दावाने दिल्ली- आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि दिल्लीतील दोन हॉटेल्सवर हल्ल्याचे षडयंत्र रचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या २६ जानेवारीच्या नियोजित भारत दौ-याआधीच भारतावर मोठा हल्ला करावा, असे सईदचे कारस्थान आहे. गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि सुरक्षा संस्थांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
नियतच पाक नाही : अॅड. उज्ज्वल निकम
पाकची नियतच पाक नाही. जामिनावर सुटलेला लख्वी हल्ल्याचे पुरावे नष्ट करू शकतो. त्याच्या जामिनाविरुध्द पाकने उच्च न्यायालयात दाद मागावी, असे २६/ ११ च्या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
वेळ चुकीची : पाक
लखवीला जामीन देण्याच्या निर्णयाच्या आपण तीव्र विरोधात आहोत. हा निर्णय चुकीच्या वेळी घेतला, असे नवाझ शरीफ सरकारने म्हटले असल्याचे ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
सुनावणीस टाळाटाळ, पण जामीन तत्काळ
रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात २००९ मध्ये मुंबई हल्ल्याचा आरोपी लख्वीसह सात आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला. सुनावणीदरम्यान अनेकदा न्यायमूर्ती बदलले. यावर्षीच्या एप्रिलमध्ये एका न्यायमूर्तीने या खटल्यातून अंग काढून घेतले. काही ना काही कारणांनी सुनावणीस कायम टाळाटाळ करण्यात आली. बुधवारी होणारी सुनावणी वकिलांच्या संपामुळे होऊ शकली नाही. मात्र, अतिरेक्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने लगेच मंजूर केला आणि दुस-याच दिवशी जामीनही देऊन टाकला.