आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रुसेल्स/ बर्लिन - अमेरिकेने जगातील 35 बड्या नेत्यांच्या फोनची हेरगिरी केल्याची धक्कादायक माहिती सीआयए या अमेरिकन गुप्तहेर संस्थेचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेनने उघड केलेल्या गोपनीय कागदपत्रांतून समोर आली आहे. ‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने हे धक्कादायक वृत्त दिले आहे.
अमेरिकी सरकारच्या दोन विभागांकडून दोनशे दूरध्वनी क्रमांकांची यादी मिळाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) हेरगिरी सुरू केली, असे स्नोडेनने उघड केलेल्या गोपनीय कागदपत्रांवरून स्पष्ट होते.
ऑक्टोबर 2006 मधील ही कागदपत्रे आहेत. एनएसएने अमेरिकेचे गृह मंत्रालय, व्हाइट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये तैनात असलेल्या अधिकार्यांकडून जगातील सर्वोच्च नेत्यांचे फोन क्रमांक मिळवले. केवळ एकाच अधिकार्याने दोनशेहून अधिक फोन नंबर उपलब्ध करून दिले. त्यामध्ये 35 जागतिक नेत्यांच्या फोन क्रमांकांचाही समावेश होता, असे ही कागदपत्रे सांगतात. मात्र, कोणत्याही जागतिक नेत्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
हेरगिरी सुरूच ठेवणार
अध्यक्ष बराक ओबामा यांनी परदेशी सहकार्यांच्या हेरगिरीबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिलेले असतानाच अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या सुरक्षेसाठी परदेशी हेरगिरी सुरूच राहील, असे अमेरिकेने म्हटले आहे.
युरोपियन नेते एकवटले
हेरगिरीच्या नव्या प्रकरणामुळे अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. ब्रुसेल्स येथे सुरू असलेल्या शिखर परिषदेसाठी एकत्र आलेल्या युरोपियन नेत्यांनी अमेरिकेच्या हेरगिरीबद्दल संताप व्यक्त करत एकजूट दाखवली आहे. हेरगिरीमुळे अमेरिकेने विश्वास गमावला असून मित्रराष्ट्रांची हेरगिरी करायची नसते, अशा शब्दांत जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.