मेक्सिको सिटी - महापौर पतीच्या भाषणाला विरोध करतील या संशयाने त्यांच्या पत्नीने ४३ युवकांना जिवंत जाळायला लावल्याच्या घटनेची कबुली आरोपींनी दिली आहे.
मेक्सिकोच्या स्मशानभूमीत सामूहिक थडगे आढळल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या संशयितांनी ही धक्कादायक कबुली दिली आहे. याप्रकरणी संबंधित महापौर आणि त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे मेक्सिकोत जनसागरात तीव्र असंतोष पसरला आहे. सप्टेंबर महिन्यात मेक्सिकोच्या इगुआला शहरात १९६८ मध्ये मारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यापन प्रशिक्षणार्थी असलेले अनेक युवकही सहभागी झाले होते.
मात्र, या कार्यक्रमानंतर ते सर्वजण अचानक गायब झाले. त्यांना शोधण्यासाठी देशव्यापी शोधमोहीमही राबवण्यात आली होती. मात्र, त्यांचा कोठेच थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, सामूहिक थडगे आढळल्यामुळे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यात त्यांनी या घटनेचा खुलासा केला. आरोपींनी या घटनेबाबत सांगितले की, कार्यक्रमात सामील युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आमच्या हवाली केले. आम्ही त्यांना आमच्या सोबत घेऊन गेलो. त्यांना खूप मारहाण केली आणि टायरच्या आगीत फेकून दिले. दुस-या दिवसाच्या मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी आग धुमसत होती. त्यानंतर राख थंड झाल्यानंतर आम्ही ती राख आणि त्यातील हाडे पोत्यात भरून नदीत फेकून दिले.
युवकांच्या कुटुंबीयांचा विश्वास नाही
बेपत्ता युवकांचे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रपरिवाराला सरकारकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास नाही. जोपर्यंत आमच्या मुलाचे शव आम्ही डोळ्यांनी पाहणार नाही तोपर्यंत त्यांच्या मृत्यूवर विश्वास ठेवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, आरोपींनी इगुआला प्रांतातील एका स्मशानातील सामूहिक थडगे पोलिसांना दाखवले होते. या ठिकाणी १७ युवकांना गाडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.