आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मघाती स्फोटात ४८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नायजेरियात साप्ताहिक प्रार्थनेच्या वेळी स्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मृतांचा अंत्यसंस्काराची तयारी करताना नागरिक.
पोतीस्कूम - ईशान्य नायजेरियातील एका शाळेत आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणलेल्या स्फोटात ४८ विद्यार्थी ठार, तर ७९ जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. मानवी बॉम्बने शाळेचा गणवेश परिधान केला होता. स्फोट शाळेच्या प्रार्थनेवेळी झाला. हल्ल्यामागे बोको हराम संघटनेचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लष्करी जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दहशतवाद नियंत्रणात आणण्यात लष्कराला अपयश येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पाच वर्षांत इस्लामी स्टेट स्थापन करण्याचा बोको हरामचा मनसुबा आहे.
यादरम्यान झालेल्या दहशतवादी कारवायांत हजारो ठार तर शेकडो बेघर झाले आहेत. मानवी बॉम्बने गेल्या आठवड्यात याच शहरात ३० नागरिकांचा बळी घेतला होता. बचावलेल्या काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात साधारण २००० विद्यार्थी सोमवारी साप्ताहिक प्रार्थनेसाठी शाळेच्या प्रांगणात जमा झाले होते. स्फोटक पदार्थ शाळेच्या दप्तरातून आल्याची शक्यता व्यक्त केली जाते. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बोको हराम कोण?
> नायजेरियात इस्लामी राज्य स्थापन करण्यासाठी २००२ मध्ये या संघटनेची स्थापना
> या संघटनेचा प्रामुख्याने पाश्चिमात्य शिक्षणाला विरोध आहे. स्थानिक हौसा भाषेत बोको हरामचा अर्थ पाश्चिमात्त्य शिक्षण निषिद्ध असा होतो
> इस्लामिक स्टेटसाठी २००९ पासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात
> दहशतवादी कारवायांचा ३० लाख लोकांना फटका
> अमेरिकेने २०१३ मध्ये दहशतवादी संघटना घोषित केले.
तालिबानींच्या हल्ल्यात १० पोलिसांचा मृत्यू
काबूल | अफगाणिस्तानमधील पोलिसांवर झालेल्या दोन स्फोटांमध्ये १० पोलिसांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैनिक हटल्यानंतर अफगाणिस्तानातील पोलिसांवर तालिबान्यांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. पुली अलाम येथील अफगाण स्थानिक पोलिस कमांडरवर आत्मघातकी हल्लेखोराने हल्ला केला. यात हल्लेखोरासह सहा जण ठार झाले. अन्य एका घटनेत लष्कराचा गणवेश घातलेल्या हल्लेखोराने कमांडरवर हल्ला केला. जलालाबाद येथे रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने एक स्फोट घडवून आणला गेला. यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला. यापैकी दोन स्फोटांची जबाबदारी तालिबानी अतिरेक्यांनी घेतली आहे. काबूलमध्ये रस्त्याच्या बाजूला स्फोटात दोन नागरिक जखमी झाले आहेत. या वर्षात तालिबान्यांच्या हल्ल्यात ४,६०० सैनिक आणि पोलिसांचा मृत्यू झाला. या वर्षअखेरपर्यंत नाटो सैनिक पूर्णपणे परततील.