आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 51 Killed, 400 Injured In Mohmad Mursy, Military Supporter Fighting Each Other

इजिप्तमध्‍ये मोहंमद मुर्सी समर्थक, लष्‍करात धुमश्‍चक्री; 51 ठार, तर 400 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - सत्तांतरानंतर इजिप्त सातत्याने धुमसत आहे. पायउतार झालेले राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांचे समर्थक व लष्कर यांच्यातील धुमश्चक्रीमध्ये 51 जण ठार तर 400 जखमी झाले. सोमवारी पहाटे ही घटना घडली. मुर्सी यांच्या सुटकेसाठी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणा-या शेकडो निदर्शकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, परंतु नमाजच्या वेळी ही कारवाई केल्याचा आरोप लष्करावर झाला आहे.


मुर्सी यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी शेकडो समर्थकांनी जोरदार आंदोलन केले. सुरक्षा दलाने कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटेच गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराच्या अगोदर एका कट्टरवादी गटाने मुख्यालयाच्या काही भागावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देताना ही कारवाई करावी लागल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. घटनेत 51 ठार तर शेकडो जखमी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी खालेद-अल-खातिब यांनी सांगितले. घटनेत एका लष्करी अधिका-याचा मृत्यू झाला, तर 40 जवान जखमी झाले. लष्कराने 200 जणांना अटक केली. मुख्यालयाला लक्ष्य करण्यामागे मुस्लिम ब्रदरहुडचा हात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच मुस्लिम ब्रदरहुडने या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. जगातील सर्व नागरिक व आंतरराष्ट्रीय समुदायाने इजिप्तमध्ये हस्तक्षेप करावा अन्यथा देशाचा दुसरा सिरिया होण्यास विलंब लागणार नसल्याचे फ्रीडम अँड जस्टीस पार्टीने म्हटले आहे. फ्रीडम पार्टी ही मुस्लिम ब्रदरहुडची राजकीय संघटना आहे. शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात 36 जण ठार तर 1000 जखमी झाले होते. मुर्सी विरोधक आणि समर्थक यांच्यातील धुमश्चक्री आठवडाभरापासून सुरू आहे.


कोठे आहेत मुर्सी ?
गेल्या आठवड्यात सत्तांतर झाल्यापासून मुर्सी यांना लष्कराने कैरोतील मुख्यालयात डांबून ठेवले आहे. तेव्हापासून त्यांना सोडण्यात आलेले नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. लष्करी जवान त्यांच्यावर चोवीस तास नजर ठेवून आहेत. 61 वर्षीय मुर्सी यांच्यासोबत त्यांचे काही वरिष्ठ अधिकारीदेखील आहेत.


लष्कराच्या पाठिंब्यासाठी रॅली
मुर्सी यांची हकालपट्टी करून सत्तेची सूत्रे हाती घेणा-या लष्कराला पाठिंबा देण्यासाठी देशातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. कैरोमध्ये सोमवारी रॅली काढण्यात आली.


पंतप्रधानांच्या शर्यतीत कोण ? : सत्तांतरानंतर देशातील नवीन पंतप्रधानपदावर कोणाची नियुक्ती होणार आहे, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी काही तासांत व्यक्तीची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. झियाद बहा अल्दीन, नोबेल पुरस्कार विजेते मोहंमद अल-बारादेई व राष्ट्राध्यक्षांचे माध्यम सल्लागार अहमद अल-मुस्लिमानी ही नावे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत.


तुर्कीकडून तीव्र निषेध
सोमवारी सकाळी लष्कराने केलेली कारवाई म्हणजे सामूहिक हत्येचा प्रकार आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. घटनेत 35 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. मानवतेच्या मूल्यांची या घटनेमुळे पायमल्ली झाली आहे, असे तुर्कीचे परराष्ट्रमंत्री अहमत डेवुटोग्लू यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे.