गाझा/ जेरूसलेम -
इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये 72 तासांकरिता शस्त्रसंधी करार करण्यात आला आहे. आता पर्यंत 1 हजार 500 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. शुक्रवारपासून (ता.1) शस्त्रसंधीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गाझापट्टीवर 72 तासांकरिता शस्त्रसंधी असेल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की-मून यांनी संयुक्तपणे काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहेत.
मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षात 1 हजार 500 नागरिकांचा बळी गेला आहे. आम्ही इस्रायल-हमासला आवाहन करत आहोत की मानवतेच्या भूमिकेवर शस्त्रसंधीचे पालन त्यांनी करावे, असे अमेरिका आणि युनोने जारी केलेल्या संयुक्त प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. तसेच हल्ले बंद राहतील आणि गाझापट्टीवर इस्रायली सैन्य राहिल, असे त्यात उल्लेख आहे. इस्रायलने संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेचा प्रस्ताव मंजूर केला आहे, असे इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्हू यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच हमासही शस्त्रसंधीसाठी तयार आहे.