लास वेगास - अमेरिकेच्या एमजीएम ग्रँड अरिनात रंगलेल्या बॉक्सिंगच्या लढतीत अमेरिकेचा फ्लॉयड मेयवेदर विजेता ठरला आहे. त्याने फिलिपाइन्सचा मॅनी पखियाओला पराभूत केले.
विशेष म्हणजे कुणाला किती पैसे मिळणार हे आधीच ठरलेले होते. त्यानुसार मेयवेदरला ११४२ कोटी रुपये व पखियाओला ७६१ कोटी रुपये मिळाले. तसेच विजेत्याला ६.३४ कोटी रुपयांचा हिरेजडित बेल्ट मिळाला. सामन्यावर २० हजार कोटी रुपयांचा सट्टा लागलेला होता.
कुठून येतोय पैसा
६०% रक्कम तिकीट विक्रीतून आली आहे. अरिनाची प्रेक्षक क्षमता १६,५०० इतकी आहे. १५,५०० जागा व्हीआयपी, तर केवळ १००० जागा सर्वसामान्यांसाठी आहेत. त्याही ६० सेकंदांतच विकल्या गेल्या. सर्वात स्वस्त तिकीट १३ लाख, तर ९५ लाख रुपयांत महाग तिकीट विकले गेले. उर्वरित ४०% रक्कम प्रायोजकांकडून मिळाली आहे.
मेवेदर अजिंक्य, तर पखियाओ गायक
मेवेदर आजवर अजिंक्य राहिलेला आहे. ५ श्रेणीत विश्वविजेता आहे. वार्षिक कमाई ६,५०० कोटी रुपये आहे. फोर्ब्जच्या यादीत अव्वल आहे. हा सर्व पैसा किताब जिंकून कमावलेला आहे, जाहिरातींतून नाही. दुसरीकडे, पखियाओ १४ वर्षांचा असताना बॉक्सिंगसाठी आईवडिलांशी भांडण करून घरातून पळून गेला होता. तो गायकही असून २ अल्बम बाजारात आलेले आहेत. तो माजी खासदारही असून फिलिपाइन्सच्या लष्करात लेफ्टनंट कर्नल आहे.
सोनी सिक्स चॅनलवर भारतात थेट प्रसारण, अमेरिकेत एचबीओ,ब्रिटनमध्ये स्काय स्पोर्ट्सवर. त्यासाठीही ९९.९९ डॉलरचा (६,३४२ रु.) रिचार्ज पॅक आहे. नेटवर पेड व्ह्यूसाठी ३० लाख लोकांनी बुकिंग केली आहे.
मी जगातील सर्वात महान बॉक्सर आहे. टायसन, महंमद अलीपेक्षाही मोठा. मी आधीही अनेक विक्रम रचलेले आहे, पुन्हा रचेन. - मेवेदर