आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शी जिनपिंग आता तहहयात राहणार चीनचे राष्ट्राध्यक्ष! कार्यकाळ मर्यादा रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनने राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन कार्यकाळांच्या अनिवार्यतेचा नियम रद्द करून रविवारी त्यात संवैधानिक दुरुस्ती केली. त्यास दोन तृतीयांश सदस्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता शी जिनपिंग यांच्यासाठी चीनचे आजीवन राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  


नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत नवीन संविधानात्मक दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. सुमारे तीन हजार सदस्यांचा समावेश असलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये संविधान दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या बाजूने २ हजार ९६४ सदस्यांनी पाठिंबा दिला तर केवळ दोन जणांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. मतदान प्रक्रियेपासून तीन सदस्य मात्र दूर राहिले. दुसरीकडे नॅशनल पीपल्स काँग्रेसला रबरी स्टॅम्प संसद असे म्हटले जाते. आता घटनात्मक दुरुस्तीमुळे ६४ वर्षीय जिनपिंग आजीवन राष्ट्राध्यक्ष म्हणून पदावर राहू शकतात.

 

-  १९८२ मध्ये सध्याची राज्यघटना  
-  चीनमध्ये १९५४ मध्ये पहिली राज्यघटना अस्तित्वात आली. 
- सध्याची राज्यघटना १९८४ मध्ये लागू झाली. त्यानंतर १९८८, १९९३, १९९९ व २००४ मध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली.  
 

स्वत:ला व कुटुंबाला भ्रष्टाचारापासून दूर ठेवा : जिनपिंग यांचे आवाहन

स्वत:ला व कुटुंबाला भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्याचे आवाहन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले आहे. राज्यघटनेच्या दुरुस्तीनंतर आपल्या भाषणात जिनपिंग म्हणाले, स्वत:ची अवनती होऊ देऊ नका. कुटुंबाची देखील अवनती होऊ नये, याची खबरदारी घ्या. लोकांना आपल्यावर चिखलफेक करण्याची संधी देऊ नका. अधिकाऱ्यांनी नियम तोडता कामा नये. प्रशासनाला भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी योगदान द्या, असे जिनपिंग यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

दोन दशकांपासून मुदत होती पक्षात अनिवार्य
सीपीसीचे संस्थापक अध्यक्ष माआे जेडांग यांच्यानंतर दोन दशकांपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष पदावर एक व्यक्ती दोन कार्यकाळ राहू शकत होती. त्यामागे हुकूमशाहीस प्रतिबंध घालण्याचा उद्देश होता.   


मतपत्रिकेचा वापर

रविवारी एनपीसीच्या मतदान प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर करणे पूर्णपणे टाळण्यात आले. मतपत्रिकेद्वारे सदस्यांनी आपला हक्क बजावला. यापूर्वी हात उंचावूनदेखील कौल घेतला जात होता.  

 

२०२३ मध्ये कार्यकाळ संपणार  होता
जिनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू आहे. हा कार्यकाळ २०२३ मध्ये संपणार होता. आता घटनात्मक दुरुस्तीमुळे ते आजीवन राष्ट्राध्यक्षपदावर राहू शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  


१९४९ नंतरचा सर्वात मोठा बदल 

चीनमध्ये एकपक्षीय राजसत्तेच्या इतिहासात १९४९ नंतरचा हा सर्वात मोठा बदल मानला जातो. तेव्हापासून राष्ट्राध्यक्षांच्या कालमर्यादेची अट रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असून हा राजकीयदृष्ट्या मोठा बदल आहे. 

 

विविध प्रकल्पांतून दबदबा 

शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात उपखंडात पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळसोबत नवीन आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातून अब्जावधी डॉलर्सची कमाई होणार आहे. त्यात चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्पाचा समावेश आहे. श्रीलंकेत चीनने एक बेट भाड्याने घेतले आहे. नेपाळमध्येही मदत दिली जात आहे. अशा पद्धतीने चीनचा जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली दबदबा वाढू लागला आहे, असे जाणकारांना वाटते.  

 

माओनंतर सर्वात शक्तीशाली नेते बनले शी

- 64 वर्षीय शी जिनपिंग सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. कायद्यानुसार, त्यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामुळे, आता त्यांनी संसदेत 2 वेळा निवडणुकीची कमाल मर्यादाच रद्द केली. अशात चीनचे आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली नेते माओत्से तुंग यांच्यानंतर शी दुसरे सर्वात ताकदवान नेते म्हटले जात आहेत. 
- यापूर्वीच त्यांनी संरक्षण, सर्वात मोठ्य़ा आणि एकमेव राजकीय पक्षाचे प्रमुख, सर्व महत्वाच्या समित्या यांचे प्रमुख पद स्वीकारले. यासाठी त्यांनी वेळोवेळी कायद्यात सुधारणा देखील केल्या. चीनमध्ये त्यांच्या तोडीचा एकही नेता नाही. त्यातच नवीन कायदा मंजूर करून त्यांनी आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी निवडून येत राहण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, चीनचे माओत्से तुंग यांनी 1966 ते 1976 पर्यंत राष्ट्राध्यक्ष भोगला. त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या डेंग जाओपिंग यांनी दुसरा माओ टाळण्यासाठी 1982 मध्ये 2 वेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची मर्यादा लागू केली. आता शी जिनपिंग यांनी ती मर्यादा मोडून काढली आहे.

बातम्या आणखी आहेत...