आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीनने मिळून संघर्ष नव्हे, नृत्य करावे;चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केले आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- डोकलाममधील तणावानंतर भारत-चीन यांच्यात संशय निर्माण झाला होता. त्याची जागा विश्वासाने घ्यायला हवी. आगामी काळात राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती असल्यास द्विपक्षीय संबंध सकारात्मक होतील. चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्तीने परस्परांसोबत संघर्ष नव्हे तर नृत्य करायला हवे. दोन्ही देश एकत्र आल्यास एक अधिक एक अकरा होईल, असा विश्वास चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केला.


गत वर्षी डोकलामचा पेच ७३ दिवसांपर्यंत चालला होता. त्यामुळे उभय देशांत युद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरवर संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधाला चीनने विरोध दर्शवला होता. त्यातून उभय देशात कटुता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर वांग गुरुवारी संसदीय अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांसाठी परिक्षेचा काळ होता. काही अडचणी होत्या. परंतु त्यातूनही भारत-चीनने सातत्याने चांगले संबंध ठेवले.


 या प्रक्रियेत चीनने आपले वैधानिक अधिकार व हितांचे संरक्षण केले. त्याचबरोबर संबंधाला टिकवून ठेवण्यावरही भर दिला होता. चीन तसेच भारताच्या नेत्यांनी आपल्या संबंधाबद्दल भविष्याच्या दृष्टीने एक रणनीति विकसित केली आहे. चिनी ड्रॅगन व भारतीय हत्ती यांनी परस्परांशी संघर्ष न करता सोबत नृत्य केले पाहिजे. त्यात परस्पर विश्वास महत्त्वाचा ठरतो. राजकीय विश्वास असल्यास हिमालय देखील मैत्रीपूर्ण संबंधात अडथळा ठरू शकणार नाही. उभय देशांच्या संयुक्त समजुतदारपणाने परस्परांतील मतभेेदांना खूप मागे सोडले आहे. चीन पारंपरिक दोस्ती वाढवण्यासाठी आणि भारतीय लोकांचा सोबती होण्यास इच्छुक आहे. तयार आहे, असे वांग यांनी सांगितले.

 

संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू
डोकलामनंतर दोन्ही देशांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर चर्चेची इच्छा दर्शवली आहे. गेल्या महिन्यात भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी बीजिंग दौरा केला होता. वांग व चीनचे मुत्सद्दी यांग जिची यांची त्यांनी भेट घेतली होती.

 

 

भारत-चीनमध्ये वादाचे मुद्दे कोणते?
- गेल्या काही वर्षांत भारत आणि चीनमध्ये काही नवीन वाद उद्भवले आहेत. त्यामध्ये सीमा भागावरून डोकलाम वाद आणि चीन-पाक इकोनॉमिक कॉरिडोर यांचा समावेश आहे. 
- 2017 मध्ये सीमावर्ती भाग डोकलाममध्ये चीनने वादग्रस्त रस्ते बांधकाम सुरू केले होते. त्यावरून दोन्ही देशांचे सैनिक 73 दिवस आमने-सामने आले होते. तर चीन-पाक आर्थिक कॉरिडोरचा मार्ग चीन पाकव्याप्त काश्मिरातून काढत आहे. त्याचा भारताकडून तीव्र विरोध आहे. 
- यासोबतच, भारत आण्विक पुरवठा करणाऱ्या देशांचा समूह एनएसजीचा सदस्य होण्यास पात्र ठरला. अनेक देशांचा यास पाठिंबा असला तरीही चीन यूएनएससीचा स्थायी सदस्य आणि एनएसजी सदस्य म्हणून भारताच्या मार्गात अडथळे आणत आहे. 
- पाकिस्तानी दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला यूएनमध्ये दहशतवादी घोषित करण्यात सुद्धा चीन अडथळे आणत आहे. 

बातम्या आणखी आहेत...