आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वुहान (चीन) - पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक शिखर बैठक शनिवारी पार पडली. भविष्यात डोकलाम वादासारखी परिस्थिती उद््भवू नये म्हणून उभय देशांनी आपापल्या लष्करांना रणनीतिक निर्देश देण्याचा निर्णय घेतला. उभयतांत विश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून संचार व्यवस्था मजबूत केली जाईल.
मोदी म्हणाले की, त्यांची चर्चा मुख्यत्वाने भारत आणि चीनदरम्यान व्यापक सहकार्यावर केंद्रित होती. बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी भारत-चीन सीमेवर शांतता कायम राखण्यावर भर दिला. दाेन्ही बाजू शांततापूर्ण चर्चेने परिपक्वता आणि समजुतदारीने आपसातील मतभेद मिटवतील, या मुद्द्यावरही एकमत झाले.
सीमावादावर तोडग्यासाठी दाेन्ही देशांनी विशेष प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. सीमाप्रश्न सुटावा म्हणून दोन्ही बाजूंनी २० वेळा चर्चा केल्या आहेत. दोन्ही देशांनी दहशतवादाला वैश्विक धोका संबोधत त्याविरुद्ध लढ्यासाठी सहकार्यावर कटिबद्धता व्यक्त केली. तथापि, अतिरेकी मसूद अजहर याच्या बाबतीत विचारल्यानंतर गोखले म्हणाले की, दहशतवादावर जास्त सविस्तर चर्चा झाली नाही. सूत्रांनुसार, या बैठकीत डोकलामच्या मुद्द्यावर
चर्चा झाली नाही.
पाकिस्तानला झटका अफगाणिस्तानात एकत्र काम करणार भारत-चीन
सूत्रांनुसार, मोदी आणि जिनपिंग यांनी अफगाणिस्तानात एकत्रित काम करण्यास सहमती दर्शवली आहे. चीन आणि भारताला इंडिया-चायना इकॉनॉमिक प्रोजेक्टसाठी अफगाणिस्तानात काम केले पाहिजे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. दरम्यान, यामुळे पाकिस्तानची चिंता वाढू शकते. पाक सातत्याने अफगाणिस्तानात भारताचा हस्तक्षेप रोखण्याच्या प्रयत्नात असतो. प्रथमच चीनने अफगाणिस्तानात एखाद्या प्रकल्पात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर त्यांनी पाकला पाठिंबा दिला आहे.
बेल्ट अँड रोड प्रकल्पासाठी भारतावर दबाव आणणार नाही :चीनचे परराष्ट्रमंत्री काँग
चीनचे परराष्ट्रमंत्री काँग जॉन्यू यांनी सांगितले की, चीन आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोडसाठी भारतावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही. पाकव्याप्त काश्मिरातून जाणारा चीन आणि पाक आर्थिक कॉरिडॉर हाही या प्रकल्पाचाच भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतार्थ चिनी कलाकारांनी बॉलीवूडचे ‘तू.. तू है वही दिल ने जिसे अपना कहा’ या लोकप्रिय गाण्याची धून वाजवली
* मोदींच्या स्वागतार्थ चिनी कलाकारांनी बॉलीवूडचे ‘तू.. तू है वही दिल ने जिसे अपना कहा’ या लोकप्रिय गाण्याची धून वाजवली. हे गाणे १९८२ मधील ऋषी कपूर आणि पूनम ढिल्लों यांच्या ‘ये वादा रहा’ चित्रपटातील आहे. विशेष म्हणजे ऋषी कपूर यांनी ट्विट करून दोन्ही नेत्यांचे आभार मानले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.