आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांपासून मुलगी बनून राहतोय मुलगा, त्याला पाहून कोमात गेलेली आई अाता पुरती सावरली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- आई जिवंत राहावी म्हणून चीनमध्ये तिचा मुलगा २० वर्षांपासून मुलीच्या रूपात राहत आहे. त्याच्या बहिणीच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याच्या आईला मनोविकार जडला. एक प्रकारे ती कोमातच गेली. कारण ती इतकी सुन्न झाली की काहीच बोलत नव्हती. अनेक उपचार करून थकल्यानंतर मुलाला एक कल्पना सुचली. तो दिवंगत बहिणीचे कपडे घालून आईसमोर गेला. त्याला पाहून आईच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. तिला वाटले की अापली मुलगीच परत आली आहे. यामुळे आईच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्याच दिवशी मुलाने बहिणीच्या रूपातच राहण्याचे ठरवले. आईसाठी त्याने लग्नही केले नाही. 

चीनच्या ग्वांग्शी प्रांतातील गुइलिन शहरात ही घटना घडली. या व्यक्तीचा व्हिडिओ चिनी मीडियाने जारी केला आहे. मात्र, त्याचे नाव जाहीर केलेले नाही. व्हिडिओत तो आईसोबत आपली कथा ऐकवत आहे. तो म्हणतो, ‘२० वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. या धक्क्याने आईची मानसिक स्थिती बिघडली. ती मलाही ओळखत नव्हती. सर्व उपाय फोल ठरत होते.

एके दिवशी मी बहिणीचे कपडे घालून तिच्यासमोर गेलाे तर तिने स्मित केले. यानंतर मी बहिणीसारखेच कपडे घालायला लागलो. नंतर कधीच पुरुषांचे कपडे खरेदी केले नाहीत. अशा अवतारात पाहून मला लोक हसायचे. मात्र, मी दुर्लक्ष केले. कालांतराने लोकांनी माझ्या कपड्यांवरून थट्टा करण्याचा प्रकार बंद केला. आज माझी आई जिवंत आणि तंदुरुस्त आहे, याचे मला सर्वात जास्त समाधान आहे.’ व्हिडिओत त्याची आईही बोलताना दिसते. ती म्हणते ‘ही माझी मुलगी आहे. माझ्या एका मुलीचा मृत्यू झाल्यापासून हा माझी दुसरी मुलगी बनला आहे.’ 

ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली अाहे. जगभरातून या मुलाची स्तुती करणाऱ्या कमेंट्स येत आहेत. सोशल मीडियावर एक युजरने लिहिले की, आईला आनंदी ठेवण्यासाठी तो २० वर्षांपासून मुलीचे कपडे घालत आहे. याचे हसू आले तरी त्याच्या मातृभक्तीला तोड नाही. दुसऱ्या युजरने लिहिले, प्रत्येकासाठी आई सर्वस्व असते. मात्र अशी मातृभक्ती दुर्मिळ अाहे. अशा मुलासाठी एक सलाम तर ठोकावाच लागेल.
बातम्या आणखी आहेत...