Home | International | China | Boeing aircraft from Beijing to Chicago, used edible oils in the fuel

इंधनात चक्क वापरलेले खाद्यतेल मिसळून बीजिंगहून शिकागोला पोहोचले बोइंग विमान

वृत्तसंस्था | Update - Nov 25, 2017, 03:21 AM IST

जेट फ्युएलमध्ये (विमानाचे इंधन) वापरलेले खाद्यतेल (युज्ड कुकिंग ऑइल) मिसळून चीनने प्रथमच आंतरराष्ट्रीय मार्गावर एका

 • Boeing aircraft from Beijing to Chicago, used edible oils in the fuel

  बीजिंग- जेट फ्युएलमध्ये (विमानाचे इंधन) वापरलेले खाद्यतेल (युज्ड कुकिंग ऑइल) मिसळून चीनने प्रथमच आंतरराष्ट्रीय मार्गावर एका विमानाचे उड्डाण केले. चीनच्या हेनान एअरलाइन्सचे हे विमान बुधवारी १८६ प्रवासी आणि चालकदलाच्या १५ सदस्यांसह बीजिंगहून शिकागोला पोहोचले. यात १५ टक्के वापरलेले खाद्यतेल आणि ८५ टक्के सामान्य विमान इंधन वापरण्यात आले होते.


  चीनने प्रथमच आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी असे इंधन वापरले आहे. बीजिंगहून उड्डाण भरल्यानंतर सुमारे ११ हजार किमीचे अंतर कापून विमान शिकागोला पोहोचल्यानंतर त्यास ‘वॉटर सॅल्यूट’ देण्यात आला. या वेळी विमानाच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा फवारा सोडला जातो.

  विशेष वेळीच विमानांना अशी सलामी दिली जाते. दरम्यान, या विमानासाठी चीनच्या सायनाेपेक या सरकारी कंपनीने हे इंधन उपलब्ध करून दिले. विमानात इंधन म्हणून वापरलेल्या खाद्यतेलास चीनमध्ये ‘गटर ऑइल’ म्हटले जाते. एअर चायनाने २०११ मध्ये बोइंग ७४७ मध्ये प्रथमच विमान इंधनासोबत वापरलेले खाद्यतेल टाकून परीक्षण करण्यात आले होते. २०१५ मध्ये याद्वारे पहिल्यांदा देशांतर्गत उड्डाण केले होते. तेव्हा विमानाचे आणि वापरलेले खाद्यतेल ५०-५० टक्के वापरले होते. त्या वेळी १५६ प्रवाशांनी या विमानातून शांघाय ते बीजिंग प्रवास केला होता. त्यापूर्वी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातही विमानात जैवइंधन वापरून विमान उड्डाणाचा प्रयत्न झाला.

  कार्बन उत्सर्जन ८० टक्के कमी होणार

  तज्ञांच्या मते, विमानात जैवइंधनाच्या व्यावसायिक वापरामुळे विमानातील कार्बन उत्सर्जन ५० ते ८० टक्के कमी करता येऊ शकते. चीनच्या विमानसेवा प्रशासनाने २०२० पर्यंत हरितगृह वायूचे उत्सर्जन ४ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

  चीनमध्ये दरवर्षी १० हजार कोटी लिटर खाद्यतेल निरुपयोगी होते

  चीनच्या हॉटेल किंवा रेस्टाॅरंटमधून दरवर्षी १ लाख मेट्रिक टन म्हणजे सुमारे १० हजार कोटी लिटर तेल टाकाऊ पदार्थाच्या रूपात बाहेर जाते. त्यावर चीनची झेनान रिफायनिंग अँड केमिकल ही कंपनी प्रक्रिया करते. आगामी काळात हेच इंधन वापरण्याचा चीन सरकार आणि बोइंग यांच्यात करार झाला आहे. विमान जैवइंधन विकसित करण्यात कमर्शियल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ऑफ चायनाची मदत करणार असल्याची घोषणा बोइंगने मागच्या वर्षी केली होती.

Trending