आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला एनएसजी सदस्यत्व नाहीच, चीन भूमिकेवर ठाम; भारताने वचन मोडल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - भारत एनपीटी (नॉन प्रॉलिफिरेशन ट्रीटी) चा सदस्य नसल्याने तो अणु पुरवठादार गटात (एनएसजी) सामील होऊ शकत नाही, या भूमिकेवर चीन ठाम आहे. ४८ देशांचा संघ असलेल्या एनएसजीमध्ये सामील होण्यासाठी भारत प्रयत्न करत असून चीन याला विरोधच करत आहे.
 
पुढील महिन्यात याविषयी निर्णायक बैठक होत असून चीनच्या ठाम भूमिकेमुळे भारताला सदस्यत्व मिळण्याची शक्यता धूसर आहे. हा तिढा कायम असतानाच आता भारत -सिंगापूर आणि भारत -जपान सैन्य करारांवरदेखील चीनने नाराजी आणि आक्षेप घेतला आहे. चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात चीनचे युद्धनीती तज्ज्ञ साँग झॉनपिंग यांनी भारताच्या दक्षिण चीन समुद्रातील नौदल कवायतींना चिथावणीखोर म्हटले आहे.
 
चीनचा पाठिंबा या प्रवेशासाठी निर्णायक आहे. एनएसजीमध्ये चीनचे वर्चस्व असून नियमांनुसार आपली मान्यता अनिवार्य असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे. पत्रपरिषदेत हुआ यांना भारताच्या एनएसजी सदस्यत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. पुढील महिन्यात स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे एनएसजी सदस्य देशांची बैठक आहे.
 
२०१६ मध्ये सेऊल येथे झालेल्या एनएसजी परिषदेत निश्चित झाल्याप्रमाणेच संघाचे काम होणे अपेक्षित आहे, असे हुआ म्हणाल्या. सदस्य देशांच्या सरकारमध्ये आण्विक करारांविषयी पारदर्शकता ठेवण्यासाठी या गटाची स्थापना झाली होती. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी दावेदारी सांगितल्यावर पाकिस्ताननेदेखील यासाठी दावेदारी सांगितली होती.
भारताला एनएसजी सदस्यत्व मिळण्यासाठी अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांचा पाठिंबा आहे. मात्र, प्रक्रियेनुसार भारताने आधी एनपीटीचे सदस्यत्व स्वीकारावे, असे चीनचे म्हणने आहे.
 
भारत एनपीटीचे सदस्यत्व स्वीकारू शकत नाही. हे संघटन भेदभावयुक्त असल्याचे भारताचे म्हणणे आहे. यासंबंधी भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांदरम्यान बैठका झाल्या. मात्र, त्यातून एनएसजी सदस्यत्वावर तोडगा निघू शकलेला नाही. एनपीटी सदस्यत्व पूर्वअट असल्यावर चीन ठाम आहे. त्यामुळे उभय देशांतील तणाव वाढला आहे. वन बेल्ट वन रोड संमेलनात भारत सामील झाल्याने संंबंध अधिक ताणले गेले आहेत. जैश महंमदच्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीन नकाराधिकार वापरत असल्याने भारताने वन रोड संमेलनावर बहिष्कार टाकला होता.
 
भारताने वचन मोडल्याचा आरोप
चीनच्या युद्धनीतीमध्ये ढवळाढवळ करण्याची भूमिका भारताने घेतली होती. सिंगापूरसोबतच्या संयुक्त कवायती याविरोधी असून भारताने वचन मोडले असल्याचे ग्लोबल टाइम्सने प्रकाशित केलेल्या लेखात म्हटले आहे. गेल्या गुरुवारी भारताने दक्षिण चीन समुद्रात सिंगापूरसह नौदल कवायती केल्या. या दिवसीय कवायती व्यापक असून त्यामुळे चीनच्या सैन्य दलांमध्ये खळबळ माजली आहे. सिमबेक्स (सिंगापूर - इंडिया मेरिटाइम बायलॅटरल एक्सरसाइज) नावाने या कवायती आयोजित करण्यात आल्या होत्या.
 
सिंगापूरसह नौदल कवायतींवर चीनचा रोष : सिंगापूरआणि भारताच्या संयुक्त नौदल कवायतींमुळेदेखील चीन नाराज आहे. दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या संयुक्त कवायती चीनसाठी डोकेदुखी ठरत आहेत. चीन सैन्याला चिथावण्याचा हा प्रकार असल्याचे चीनच्या सैन्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाणबुडीरोधक कवायती भारत करत असून हिंद महासागरातील चीनच्या पाणबुड्यांसाठी हे घातक असल्याचे चीनचे संरक्षण तज्ज्ञ साँग झोंगपिंग यांनी म्हटले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...