आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये 92 अब्ज डॉलरचा मालक वारसदाराच्या शोधात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग : चीनमधील अब्जाधीशाकडे ९२ अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे. आपण वारसदाराच्या शोधात आहोत असे त्याने सांगितले. त्याच्या मुलाने वारसा चालवण्यास नकार दिल्याने त्याने हा शोध सुरू केला आहे. ६२ वर्षीय वांग जियालीन दालियान वांडा समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. अनेक शॉपिंग मॉल्स, थीम पार्क, क्रीडा क्लब, सिनेमागृहे या समूहाद्वारे चालवण्यात येतात. व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीकडे आपण वारसा हस्तांतरित करू इच्छितो, असे वांग यांनी सांगितले.

वारसा हस्तांतराविषयी मी मुलाशी चर्चा केली. मात्र त्याने सांगितले की, ‘मी तुमच्यासारखे आयुष्य जगू इच्छित नाही.’ वांग यांनी हाँगकाँग येथील एका आघाडीच्या दैनिकाला ते वारसदाराच्या शोधात असल्याचे सांगितले. चायना आंत्रप्रेन्युअर समिटमध्ये त्यांनी आपली समस्या मांडली. तरुण मुलांचे स्वत:चे दृष्टिकोन असतात. त्यांचे प्राधान्यक्रम असतात. मुलावर उद्योग लादण्यापेक्षा मी व्यवस्थापकीय कौशल्य असणाऱ्या व्यक्तीकडे वारसा देईन. संचालक म्हणून केवळ देखरेख करेन, असे वांग यांनी सांगितले.

१९८८ मध्ये वांग यांनी दालियान या बंदरगावी वांडा कंपनीची स्थापना केली. छोट्या प्रॉपर्टी उद्योगापासून त्यांची सुरुवात झाली होती. वांग यांना एकुलता एक मुलगा आहे. वांग यांनी भारतभेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आश्वासन दिले होते की ते हरियाणामध्ये उद्योग उभारणीसाठी १० अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणार आहेत. जगातील सर्वात मोठी चित्रपटगृह शृंखंला त्यांच्या मालकीची आहे.
१८२ अतिश्रीमंत कुटुंबांच्या माहितीचे संकलन, वारसदारांनी स्विकारला नवा मार्ग
चीनमधील अनेक अतिश्रीमंत उद्योजकांची मुले त्यांच्या वडिलांच्या उद्योगाला पुढे नेऊ इच्छित नाहीत. त्यांनी आपले स्वतंत्र मार्ग निवडण्याला प्राधान्य दिले आहे. अतिश्रीमंतांच्या वारसांपैकी ८०% मुले वारशाकडे पाठ फिरवत आहेत. शांघाय जिआेतांग विद्यापीठाने देशातील १८२ अतिश्रीमंत कुटुंबांच्या माहितीचे संकलन केले आहे. या कुटुंबांतील वारसदारांनी नवा मार्ग चोखाळल्याचे यात स्पष्ट झाले.

ही आहेत कारणे : कामाचा अति दबाव, दुसऱ्या करिअरविषयी प्रचंड आकर्षण ही दोन प्रमुख कारणे यात समोर आली. असोसिएशन ऑफ चायनीज प्रायव्हेट स्टडीजने या कारणांचा शोध घेतला.
बातम्या आणखी आहेत...