आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोच्या विक्रमावर चीन भडकला; ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात म्हटले, भारत खूप मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात पाठवण्याच्या इस्रोच्या जागतिक विक्रमानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे; परंतु शेजारील चीनची पाेटदुखी वाढली आहे. भारताच्या दृष्टीने ही कामगिरी कदाचित मोठी असेल, परंतु अंतराळ तंत्रज्ञानात भारत अजूनही अमेरिका, चीनपेक्षा खूप मागे आहे, असे ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात म्हटले आहे.  

चीनमध्ये सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधील विचार सरकारची भूमिका मांडणारे असतात. त्यामुळे चिनी सरकार भारताच्या कामगिरीमुळे भडकल्याचे दिसून येत आहे. २०१३ च्या भारताच्या मंगळयान मोहिमेवरही चीनने टीका केली आहे. त्यात गरिबी, निरक्षरतेचा हवाला देऊन भारतावर आरोप केले आहेत. शंभर उपग्रहांना एकाच वेळी कमी पैशांत प्रक्षेपित करण्याचे भारताचे काम नक्कीच मोठे आहे. इतर देशांनी भारताकडून शिकले पाहिजे. भारतात त्याकडे देश भावनेशी जोडून पाहिले जात आहे, परंतु अंतराळ तंत्रज्ञान हा काही आकड्यांचा खेळ नव्हे. १०४ उपग्रह पाठवले असले तरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत अजूनही अमेरिका, चीनच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे, असा दावा करण्यात आला आहे.  

भारत शुक्र ग्रहावरदेखील यान पाठवण्याची योजना तयार करत आहे, परंतु त्या योजनेचा अपेक्षित पाठपुरावा घेतला जात नाही. प्रदीर्घ अंतराळ मोहिमेवर जाण्याची क्षमता असलेले रॉकेट भारताकडे उपलब्ध नाही. सध्या अंतराळात भारताचा एकही प्रवासी नाही. त्याचबरोबर अंतराळ स्थानक स्थापन करण्याचीदेखील भारताकडे काही योजना नाही, असे चिनी वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे. चीनकडून एकीकडे भारताशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला जाताे. दुसरीकडे पाकिस्तानशी सलगी करून दहशतवादी, घुसखोरीसारख्या गोष्टींना खतपाणी घातले जाते.  तंत्रज्ञानातील भारताचा विकास चीनला बघवत नाही, असे परराष्ट्रविषयक  जाणकारांना वाटते. 
बातम्या आणखी आहेत...