आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Is Ready To Talk On Zaki Ur Rehman Lakhavi's Issue

लखवीप्रकरणी चर्चेस चीनची तयारी, मोदी-स्वराज यांनी मांडला होता मुद्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहमान लखवी प्रकरणी भारताशी चर्चा करण्यास चीन तयार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अाशिया विभागाचे उपमहासंचालक हुआंग शिलियान यांनी दिली.

चीन आणि भारत दोघेही दहशतवादी कारवायांनी ग्रासले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांना एक कार्यक्रम आखावा लागेल. एखादा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यापूर्वी आपसांत सविस्तर चर्चा व्हायला हवी. यासाठी चीनची पूर्ण तयारी असल्याचे शिलियान म्हणाले. याच मुद्द्यावर दोन्ही देशांत या वर्षी चर्चा होणार आहे, हे इथे उल्लेखनीय होय. शिलियान म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्याबाबत भारत व चीनचे विचार सारखेच आहेत. तात्त्विक पातळीवर हे मुद्दे एकच असल्याने परस्पर सहकार्य व विचाराअंती आपसांत संपर्क ठेवून हे मुद्दे मांडले जाऊ शकतात. संयुक्त राष्ट्रसंघात लखवीप्रकरणी भारताने उपस्थित केलेल्या प्रस्तावास चीनने विरोध केला होता. मास्टरमांइड मोकाट फिरत असल्याबद्दल भारताने आक्षेप नोंदवला होता.

सईद-सलाउद्दीनही...
केवळ लाखवीवर कठोर कारवाईचा प्रस्तावच नव्हे तर यापूर्वीही चीनने अन्य प्रकरणात भारताच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत खोडा घातला आहे. हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद साउद्दीन आणि लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईद यांच्याविरुद्ध कारवाईची भारताने केलेली मागणी चीनने तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे फेटाळली होती. मुंबईवरील हल्ल्याने जगही हादरले होते.

दहशतवादी लखवी आहे कोण?
मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी लखवी हल्लेखोरांना पाकिस्तानातून सूचना देत होता. तसे पुरावे भारताकडे उपलब्ध आहेत. हाच मुद्दा भारताने सुरक्षा समितीसमोर मांडला होता.

पाकने भारताविरुद्ध पुरावे दिलेले नाहीत
वॉशिंग्टन | भारत पाकमध्ये दहशतवाद्यांना फूस लावत असल्याबाबत कोणतेही पुरावे पाकिस्तान देऊ शकलेला नाही, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यात पाकचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पाकमधील दहशतवादी कारवायांत भारताचा हात असल्याचे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले होते.