आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या पहिल्या विमानवाहू नौकेची चाचणी दक्षिण चीन समुद्रात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनने दक्षिण चीन समुद्रात आपली व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरू ठेवली आहे. विमानवाहू नौकेची चाचणी चीनने या वादग्रस्त जलक्षेत्रात घेतली. लढाऊ जहाजांचा ताफा घेऊन ही चाचणी घेण्यात आल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तैवान राष्ट्राध्यक्षांना केलेल्या टेलिफोन कॉलमुळे तर चीन अधिक  आक्रमक झाला आहे. 
 
सोमवारी या विमानवाहू युद्धनौकेवरून विमानांची उड्डाणे व लँडिंगची चाचणी झाली. लिआेनिंग नामक युद्धनौकेवरून विमान उड्डाणाच्या वार्ता चिनी माध्यमांनी प्रकाशित केल्या. या वादग्रस्त जलक्षेत्रामधील चीनची आक्रमकता शेजारी देशांशी असलेल्या संबंधात दरी वाढवत आहे. जे-१५ युद्ध विमानांची चाचणी या वेळी घेण्यात आली. एकूण किती विमानांचा यात समावेश होता याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
  
हवामान अनुकूल नसतानाही अत्याधुनिक युद्धसामग्री व तंत्राच्या साहाय्याने ही चाचणी यशस्वी करण्यात आली. पाणबुड्या व युद्धनौकांच्या क्षमता तपासण्यासाठी हा सराव करण्यात आल्याचे चीनच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. बोहाई सागरात देखील चाचण्या घेतल्याचे चीनच्या नौदल सूत्रांनी सांगितले. सध्या चीन आपली दुसरी विमानवाहू नौका बांधत आहे.  

एकसंध चीनच्या वक्तव्यामुळे आक्रमकता वाढली
बाेहाई सागरात हवेतून हवेत, हवेतून जलक्षेत्रात, जहाजावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी झाल्याचे नौदलाने सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकसंध चीनच्या संकल्पनेला तडा दिल्याने चीन आक्रमक झाल्याचे दिसून आले. लिआेनिंग युद्धनौका सध्या तैवानच्या आसपास फिरत असून चीन शक्तिप्रदर्शनाचे आक्रमक दर्शन घडवत आहे. तैनानच्या राष्ट्राध्यक्षा त्साइ इंग वेन यांच्याशी ट्रम्प यांनी साधलेल्या संवादामुळे राजनयीक नियमांचा भंग झाल्याचे चीनचे म्हणणे आहे.  

तिबेट सीमेवरील तैनात वाढवली
तिबेटमधील स्वतंत्र तिबेट आंदोलकांवर मात करण्यासाठी येथील तैनात चीनने वाढवली आहे. दक्षिण अाशियाचे द्वार म्हणून तिबेट चीनच्या व्यापारी धोरणासाठी मोक्याचे ठिकाण आहे. गेल्या महिन्यात चीनने रेल्वे व रस्ते मार्गाने तिबेटमार्गे नेपाळमध्ये २.८ दशलक्ष डॉलर्सच्या चिनी मालाची वाहतूक केली. तिबेटमधील ३ लाख २० हजार लोक पर्यटन उद्योगात काम करतात. २०२० पर्यंत येथे दरवर्षी ३० दशलक्ष पर्यटक भेट देतील. त्यामुळे चीनसाठी तिबेट ही महत्त्वाची बाजारपेठही सिद्ध होत आहे.
बातम्या आणखी आहेत...