आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता वकिलांच्या पत्नींचे चीन सरकारला आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन गुइकी यांना काही वर्षांपूर्वी आपले वकील पती शाई यांग यांच्या कामाविषयी फार माहिती नव्हती. ते किती जोखमीचे काम करत आहेत, याचीही कल्पना नव्हती. दोन वर्षांपूर्वी  शाई यांना चिनी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ते ‘बेपत्ता’ झाल्याचे कळले. या घटनेपूर्वी चेन यांचा पोलिसांवर विश्वास होता. मात्र, पोलिसांनी त्यांनाही देश सोडून जाऊ शकत नसल्याचे सांगितले तेव्हा त्यांचा विश्वास उडाला. मार्च महिन्यात चेन आपल्या दोन्ही मुलींना घेऊन थायलंडमार्गे अमेरिकेत पोहोचल्या.
 
चेन यांनी टेक्सासमधील एका घरून टेलिफोनवर सांगितले की, ‘चीनमधील पोलिस विभाग तसेच मी काम करत असलेल्या कंपनीकडून प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे. चहुबाजूंनी दबाव आहे. माझी देशाप्रती निष्ठा आणि आशा हळूहळू ढासळू लागली आहे. प्रत्येक वेळी कुणी तरी माझ्या मागावर असल्याचे जाणवते. त्यामुळे मी मोकळा श्वास घेऊच शकत नव्हते.’
 
जुलै २०१५ मध्ये चीन सरकारने मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या वकिलांचे अटकसत्र सुरू केले. तेव्हापासून चेन यांच्या कुटुंबाची अशी वाताहत सुरू झाली. चेनसारख्या अन्य महिलांच्या वकील पतींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी काही जण सध्या कुठे आहेत, हेदेखील सांगितले जात नाही. चेनसह अन्य काही महिलांनी वॉशिंग्टनमधील अमेरिकी संसदेसमोर नुकतीच आपली कहाणी सांगितली. चिनी सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या ज्या व्यक्तींना अवैधरीत्या अटक झालेली आहे, त्यांचे कुटुंबीय विशेषत: पत्नी आता जाहीरपणे व्यक्त होत आहेत. आपल्या पतीविषयी माहिती मिळवण्यासाठी तुरुंगापर्यंतही जातात, वकिलांची भेट घेतात, न्यायालयात सुनावणीदरम्यान पतीची बाजू ठामपणे मांडतात. त्यांच्या पेहरावावरही त्यांची मागणी स्पष्ट करणारे शब्द लिहिलेले असतात. जेणेकरून अन्य नागरिक व सरकारला या समस्येचे गांभीर्य कळेल.  
चेन यांच्याप्रमाणेच ली वेंजू यांचे पती वांग क्वानझांग हेदेखील मानवी हक्कांसाठीचे वकील आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती. त्यानंतर वांग यांना गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
 
शिकागो येथील अमेरिकन बार फाउंडेशन येथील संशोधक टेरेन्स हेलिडे म्हणतात, चीनमध्ये कुणालाही सरकारविरोधात आवाज उठवण्याची परवानगी नसते. या षड््यंत्राचाच हा एक भाग आहे.
ली हेपिंग या अन्य एका वकिलाच्या पत्नी वांग काओलिंग म्हणाल्या, चिनी सरकारचे तपास अधिकारी अटकेतील नागरिकांवर आरोप स्वीकारण्याचा दबाव टाकतात. मात्र, दिवसेंदिवस ते अमानुषपणे वागणूक देत आहे. ली यांना नुकतेच शिक्षेनंतर सोडून देण्यात आले आहे. वांग म्हणतात, सरकारी अधिकारी आपल्याला ‘नूडल’प्रमाणे हाताळतात. जेणेकरून आपल्याला कोणत्याही आकारात बसवता येईल. आपण घाबरलो तर जगणे कठीण होऊ शकते.  
 
अन्य अटकेतील वकिलांच्या पत्नी सांगतात, पोलिसांनी घरमालकाला धमकी देऊन आम्हाला घरातून काढून टाकले. मुलांनाही शाळेत प्रवेश दिला जात नाही. गप्प बसण्यासाठी तसेच तक्रार करू नये म्हणून नातेवाइकांनाही धमक्या देतात. तपास अधिकारी आणि पोलिसांच्या गैरवर्तणुकीसमोर काही कुटुंबे माघार घेतात, मात्र काही जण याला विरोध करत पुढे येत आहेत. आपल्या माणसांना कुठे आणि का अटकेत ठेवले आहे, हा प्रश्न न्यायालयात विचारत आहेत. वांग काओलिंग यांच्यासोबत अनेक महिला आहेत. आपण हातावर हात ठेवून बसलो तर नुकसान होऊ शकते, असे त्यांना वाटते. वांग काओलिंग म्हणतात, आम्ही शांत बसलो तर कुटुंबाचे संरक्षण कोण करणार? अटकेतील काही वकील बहुतेक बीजिंगमध्ये आहेत. चेन यांचे घर हुनान प्रांतात म्हणजेच बीजिंगपासून १६०० किलोमीटर अंतरावर आहे.
 
चेन म्हणतात, ‘आम्ही शांत बसलो तर आमचे पती सुखरुप परत येतील, असे पोलिसांनी सांगितले होते. ९ महिन्यांपर्यंत आम्ही शांत राहिलो. पण काहीच घडले नाही. चीनमध्ये कोणत्याही सरकारी कार्यालयात कायद्याचे पालन केले जात नाही. कायदेशीर मदत मागितल्यास कुणीही उत्तर देत नाही. ही कायदेशीर लढाई असून मला कायद्याच्या मदतीने माझ्या पतीला वाचवायचे होते. मात्र, कायद्याच्या कक्षेत राहून हे करणे आता कठीण दिसते आहे. या नैराश्यातूनच मला माझ्यासारखीच अन्य कुटुंबे दिसली, यामुळे मी पुन्हा एकदा उभी राहिले आहे. वांग यांच्याकडून मला सल्ला आणि प्रोत्साहनही मिळते.’
दरम्यान, बीजिंगमध्ये चेन यांच्या पतीची शिक्षा माफ करण्यात आली असून त्यांना चांगशा येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पण त्यांना कुणाशीही बोलण्याची परवानगी नाही. शाई एकदिवस आपल्यासोबत अमेरिकेत असतील, या आशेवर चेन प्रत्येक परिस्थितीला धीराने तोंड देत आहेत.
- क्रिस बकले आणि दीदी क्रिस्टन तातलोव 
बातम्या आणखी आहेत...