आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रेट वॉल ऑफ चायना’च्या दुरुस्तीचा दर्जा ढिसाळ असल्याने रोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या ७०० वर्षे जुन्या ऐतिहासिक भिंतीचे दुरुस्तीकाम अत्यंत दर्जाहीन असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुझिहाँग काउंटी येथे ही ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ असून ते जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. या दुरुस्तीकामासाठी कुशल कामगारांचा वापर केला नसल्याची टीका जनतेने केली आहे. येथे लाखो पर्यटक भेट देतात. या वॉलचा शीहेकोऊ नामक भाग पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करतो. रपेट मारण्यासाठी येणारे पर्यटक या स्थळाला हमखास भेट देतात. राष्ट्रीय वारसास्थळ म्हणून याचे जतन होणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

असा सुरू झाला वाद :
२०१४ मध्ये चीनच्या भिंतीचा जीर्णोद्धार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर नुकतेच काही छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. या छायाचित्रांत भिंतीचा काही भाग पांढऱ्या आवरणाने झाकलेला दिसून येतो. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ती वाळूसारखी माती आहे. मात्र नेटीझन्सला वाटले की ते सिमंेट आहे. भिंतीवर सिंमेट लावल्यास त्याची पारंपरिक भव्यता लोप पावत असल्याचे मत नेटीझन्सने नोंदवले. शिवाय भिंतीचा रंगही ऐतिहासिक वारशाला मारक असल्याचे मत सोशल मीडियावर नोंदवण्यात आले. आता जीर्णोद्धाराचे कामच सार्वजनिक वादाचा मुद्दा झालाय.

स्थानिक नागरिकाने दिली साक्ष: लीयू फुशेंग हे येथील स्थानिक रहिवासी आहेत. शीहेकोऊ येथे आपण दररोज भ्रमण करतो असा दावा त्यांनी केलाय. येथे काम करणारे मजूर सिमेंट मिश्रित पांढरा गिलावा वापरत असल्याचे आपण पाहिले आहे असे त्यांनी सांगितले. वाळूचाही भरमसाठ वापर होताना मी पाहिलाय असे फुशेंग म्हणाले. येथील रस्त्याचा पृष्ठभाग चकाचक करण्यासाठी हे साहित्य वापरण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान हे दावे खरे नसल्याचा खुलासा स्थानिक प्रशासनाने केला आहे.

निकडीचा प्रकल्प : मुसळधार पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी हे दुरुस्तीकाम आणीबाणीची सोय म्हणून हाती घेण्यात आल्याचे सारवासारवीचे उत्तर सुझिहाँग प्रशासनाने दिले आहे. त्यात सिमेंट कणभरही नाही असा दावा प्रशासनाने केलाय. लीआनिंग प्रादेशिक सांस्कृतिक विभागानेदेखील स्थानिक प्रशासनाची बाजू घेतली आहे. ८ किलोमीटर पर्यंतचा परिसर नैसर्गिक आपत्तीत ढासळू शकतो त्यामुळे हा निकडीचा प्रकल्प म्हणून राबवण्यात येत असल्याचा खुलासा प्रशासनाने दिलाय.

धूळ, पाण्यापासून बचावाची गरज : या दगडी बांधकामाला धूळ व पाण्यापासून वाचवण्याची गरज आहे असे मत पुरातत्त्व तज्ज्ञांनी नोंदवले. दगडी चवड ढासळू नये म्हणून मुलामा दिल्याचे स्पष्टीकरण दिले.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील बांधकाम
द ग्रेट वॉल ऑफ चायनाची निर्मिती इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सुरू झाली होती. मिंग घराण्याच्या कार्यकाळात (१३६८-१६४४) तिचा २१ हजार किलोमीटरपर्यंत विस्तार झाला. दरवर्षी याला ४ दशलक्षपेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. भूकंप, पाऊस आणि पर्यावरण बदलांमुळे याचा बराचसा भाग खचला आहे.
बातम्या आणखी आहेत...