Home | International | China | India-China border talks next month

भारत-चीनमध्ये पुढील महिन्यात सीमाप्रश्नी चर्चा; मोदी-जिनपिंग भेटीबद्दल सांगण्यास नकार

वृत्तसंस्था | Update - Nov 11, 2017, 03:00 AM IST

भारत आणि चीनमध्ये पुढील महिन्यात सीमा प्रश्नावर तसेच इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेेक्षा आहे.

 • India-China border talks next month
  बीजिंग- भारत आणि चीनमध्ये पुढील महिन्यात सीमा प्रश्नावर तसेच इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेेक्षा आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दुसऱ्या कार्यकाळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच दोन्ही देशांत चर्चा होईल.

  चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी शुक्रवारी सांगितले की, भारत-चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींची २० व्या फेरीची चर्चा तसेच रशिया, भारत आणि चीन (आरआयसी) यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा लवकरच आयोजित केली जाईल. त्यांनी या दोन्ही चर्चांचे वेळापत्रक सांगण्यास मात्र नकार दिला. मात्र, या दोन्ही चर्चा पुढील महिन्यात दिल्लीत होतील, अशी अपेक्षा आहे.

  भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे स्टेट कौन्सिलर यांग जिएची यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा होईल. त्यांची या चर्चेसाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे. द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंबाबत चर्चा करण्याचे अधिकारही या दोन उच्चाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हुआ म्हणाल्या की, चीन आणि भारत या दोन्ही देशांचे नेते सीमा प्रश्नाला सर्वाधिक महत्त्व देतात. हा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न केले आहेत. मागील बैठकीत विशेष प्रतिनिधींनी यासंदर्भात सकारात्मक प्रगती केली आहे. आता ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे.

  आरआयसीच्या बैठकीत डोकलाममधील पेचाशिवाय इतरही मुद्द्यांवर चर्चा होईल. ५० अब्ज डॉलरच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) मुद्द्यावर भारत आणि चीन यांच्यात तीव्र मतभेद आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सीपीईसी हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा (बीआरआय) महत्त्वाचा हिस्सा आहे. सीपीईसी पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने त्याला आक्षेप घेतला आहे.
  मोदी-जिनपिंग भेटीबद्दल सांगण्यास नकार
  पूर्व आशिया परिषद फिलिपाइन्समध्ये होणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार का, याबाबत काहीही सांगण्यास हुआ यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या की, माझ्याकडे याबाबत अधिकृत माहिती नाही. चर्चा करायची असेल तर दोन्ही बाजू परस्परांच्या संपर्कात असतात.

Trending