बीजिंग- आण्विक पुरवठादार गटात (एनएसजी) भारताच्या समावेशाला चीनच्या सरकारी माध्यमानेही मंगळवारी अधिकृत आक्षेप जाहीर केला. भारताला या गटात प्रवेश दिल्यास पाकिस्तानच्या ‘दुखत्या नसे’वर हात ठेवला जाईलच; शिवाय विभागात अण्वस्त्र स्पर्धाही सुरू होईल तसेच चीनचे राष्ट्रीय हितही धोक्यात येईल, असे या माध्यमाने म्हटले आहे.
चीनने भारताच्या एनएसजीतील समावेशाला विरोध केल्यापासून पहिल्यांदाच ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्रात या विषयावर लेख प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रसज्ज देश असून ते कायमच एकमेकांच्या क्षमतेची चाचपणी करत असतात. आण्विक क्षमतेत भारताच्या मागे राहणे पाकिस्तानला सहन होणार नाही. त्यामुळे विभागात अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू होईल. त्यामुळे विभागीय सुरक्षितता कमकुवत होईलच शिवाय चीनच्या हितालाही बाधा निर्माण होईल गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच देशांचा दौरा केला. भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा मिळवणे हाच त्यांच्या या दौऱ्याचा हेतू होता. अमेरिका आणि एनएसजीचा काही सदस्य देशांनी भारताच्या मोहिमेला पाठिंबाही दिला आहे; पण अनेक देशांनी विशेषत: चीनने त्याला विरोध केल्याने भारत संतप्त झाला आहे, असेही या वृत्तपत्राने नमूद केले आहे. व्हिएन्ना येथे २४ जूनला एनएसजीचा ४८ सदस्य देशांची बैठक होत आहे.
तेथून आलेल्या वृत्तानुसार, बहुतांश देशांनी भारताला सदस्यत्व देण्यास पाठिंबा दिला असला तरी चीन, न्यूझीलंड, आयर्लंड, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रिया या देशांनी मात्र त्याला विरोध केला आहे.