आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगोलियाला भारताची मदत म्हणजे लाच : चीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या मंगोलियाला भारतातर्फे एक अब्ज डॉलरची मदत म्हणजे लाच आहे, अशी टिप्पणी चीनच्या सरकारी माध्यमांनी केली आहे. या प्रकारामुळे चीन-भारत यांच्यातील करारांत अनेक अडचणी येणार आहेत, असा दावाही माध्यमांनी केला आहे.
‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी वृत्तपत्रात प्रसिद्ध लेखात म्हटले आहे की, शेजारील देश मंगोलियाच्या अर्थव्यवस्थेवर चीनचा मोठा प्रभाव आहे. त्या देशाच्या आयात-निर्यातीत चीनचा वाटा ९० टक्के आहे. तेथील उत्पादनांना चीनमध्ये मोठी बाजारपेठ आहे.
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या मंगोलियाला भारताने केलेल्या मदतीमुळे मंगोलियाची स्थिती सुधारणार नाही. कारण संकटाच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे.
गेल्या वर्षी मेमध्ये मंगोलियाच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केली होती. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या मंगोलिया दौऱ्यामुळे नाराज होऊन चीनने मंगोलियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत.
एनएसजी-अझहरबाबत चीनची भूमिका कायमच
एनएसजीचे सदस्यत्व आणि जैश-ए-मोहंमदचा प्रमुख मसूद अझहरला दहशतवादी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे. चीन या दोन्ही मुद्द्यांवरील आपल्या भूमिकेत कुठलाही बदल करणार नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी सोमवारी पत्रपरिषदेत हा दावा केला. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी मागील आठवड्यात म्हटले होते की, एनएसजीचे सदस्यत्व आणि मसूद अझहर प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चीन करत आहे.
दहशतवादाशी लढा देण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांत अजूनही सहमती झालेली नाही. त्यावर शुआंग म्हणाले की, आमच्यात अनेक मुद्द्यांवर समन्वय आहे, पण प्रत्येक मुद्द्यावर एकमत असावे हे आवश्यक नाही.
बातम्या आणखी आहेत...