आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा बीआरएफवर बहिष्कार, ‘प्रकल्प सार्वभौमत्वाचे उल्लंघन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीन-पाकिस्तानचा आर्थिक प्रकल्प (सीपीईसी) सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा आहे, असे भारताने चीनला सुनावले असून बेल्ट रोड फोरम संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये दोन दिवसांचे बेल्ट रोड फोरम (बीआरएफ) संमेलन रविवारी सुरू करण्यात आले आहे. त्यात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख, २९ देशांचे राष्ट्राध्यक्ष तसेच १३० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.  
 
भारताकडून या संमेलनात कोणीही सहभागी झाले नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आपल्या देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसह त्यात सहभागी झाले आहेत. उद््घाटनाच्या समारंभात प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले, सर्व देशांनी परस्परांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. त्यांनी प्राचीन सिल्क रोडसह सिंधू व गंगा नदीच्या किनारी असलेल्या संस्कृतीचे महत्त्व सांगितले. सीपीईसीवरील भारताच्या आक्षेपांकडे कानाडोळा करून त्यांनी सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचे गोडवे गायले. अखंडतेचा सन्मान करावा, असे आवाहन केले. त्याचबरोबर परस्परांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. देशांचा वेगळा किंवा छोटा गट बनवत नसल्याचे स्पष्ट करून जिनपिंग म्हणाले, आम्ही आमच्या देशाला आशिया, युरोपसह अमेरिकेला जोडण्याच्या प्रयत्नात आहोत.  नवाझ शरीफ म्हणाले, चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्प (सीपीईसी) सर्व देशांसाठी खुला आहे. या मुद्द्यावर राजकारण केले जाऊ नये. हा आर्थिक उपक्रम आहे. त्याला काहीही भौगोलिक सीमा नाहीत, असे शरीफ यांनी सांगितले. भारताने बहिष्कार घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी संमेलनात हे वक्तव्य केले.  
 
अनेक योजनांची घोषणा  
२०१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या सिल्क रोड फंडमध्ये १४.५ अब्ज डॉलर (सुमारे ९३ हजार २५० कोटी रुपये) देण्यात येत असल्याची घोषणा जिनपिंग यांनी या वेळी केली. त्यामुळे आता हा निधी ५५ अब्ज डॉलरचा झाला आहे. जिनपिंग यांनी वन बेल्ट वन रोड योजनेत सहभागी देशांनादेखील ८.७५ अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केली.   संमेलनात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटागियो गुटेरे, आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे प्रमुख क्रिस्टिना लेगार्ड, जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तैयिप एर्दोगन, झेक राष्ट्राध्यक्ष मिलॉस जॅमन, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे हे नेते सहभागी झाले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...