आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलाम प्रकरणापासून भारताने धडा घ्यावा, भविष्यात असा प्रकार होऊ देऊ नये: चिनी परराष्ट्रमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- भारताने आपले सैनिक मागे घेतल्यानंतरच डोकलाम प्रकरणावरून निर्माण झालेला ७३ दिवसांचा वाद संपुष्टात आला, असा दावा चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी बुधवारी पुन्हा केला. भारताने या प्रकरणातून ‘धडा घ्यावा’ आणि भविष्यात असा प्रकार होऊ देऊ नये, असा सल्लाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेशी संबंधित ही पत्रकार परिषद होती.  

डोकलाम प्रकरणी दोन्ही देशांत तोडगा निघाल्यानंतर भारताने आपले सैन्य मागे घेऊन चीनवरील नामुष्की टाळली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना वांग म्हणाले की, ‘भारताच्या घुसखोरीमुळे निर्माण झालेल्या सीमा वादावर आता तोडगा निघाला आहे. चिनी माध्यमांनी काहीही तर्क लावला असला तरी भारतीय सैनिकांनी २८ ऑगस्टला दुपारी माघार घेतल्याची ‘अधिकृत माहिती’ चीन सरकारकडे आहे. त्यामुळे आता हा पेच संपुष्टात आला आहे हीच वस्तुस्थिती आहे. भारताने या प्रकरणापासून धडा घेतला असावा आणि भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजी तो देश घेईल, अशी आमची अपेक्षा आहे.’ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यावर तत्काळ कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.  
चीन आणि भूतान यांच्यातील डोकलाम या वादग्रस्त भागात चिनी सैनिकांनी रस्त्याचे काम सुरू केले होते. भारतीय सैनिकांनी ते रोखल्यानंतर दोन्ही देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झाला होता. ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच दोन्ही देशांनी २८ ऑगस्टला सैन्य माघारी घेऊन हा वाद संपुष्टात आणला. 

‘दोन्ही देश मोठे, समस्या निर्माण होणे स्वाभाविकच’  
एका प्रश्नाला उत्तर देताना वांग म्हणाले की, भारत आणि चीन हे दोन मोठे देश आहेत. त्यामुळे काही समस्या निर्माण होणे स्वाभाविकच आहे. आम्ही मतभेदाचे मुद्दे योग्य ठिकाणी मांडतो, तरीही परस्परांचा आदर करतो. त्यानंतर आमच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर ते योग्य पद्धतीने हाताळण्याची आता गरज आहे. दरम्यानच्या काळात विविध यंत्रणांच्या माध्यमातून दीर्घकालीन तोडगा काढणे गरजेचे असते.  चीनमधील शिआमेन शहरात ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांची शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी या परिषदेला उपस्थित राहतील, अशी घोषणा मंगळवारी केली होती.  
बातम्या आणखी आहेत...