आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलास यात्रेकरूंसाठी नथू ला मार्ग खुला लष्कराचे सहकार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाइड्युला (चीन) - कैलास मानसरोवर यात्रेला जाणार्‍यांसाठी चीनने नथू ला मार्ग खुला केला आहे. यात्रेकरूंचा पहिला चमू मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाला. समुद्र सपाटीपासून ४००० मीटर उंचीवर नथू ला मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन भेटीदरम्यानच हा मार्ग यात्रेकरूंसाठी खुला करण्याच्या निर्णयावर सहमती झाली होती. यापूर्वी मानसरोवर यात्रेकरूंना केवळ लीपुलेख पास हा एकमेव मार्ग उपलब्ध होता. वर्ष २०१३ मध्ये उत्तराखंडात आलेल्या पुराने या मार्गाची मोठी हानी झाली होती.

४४ यात्रेकरूंचा पहिला चमू सिक्कीम सीमेवरून सोमवारी रवाना झाला. तिबेटातील चिनी लष्कराने त्यांचे स्वागत केले. तिबेटात ६ हजार ५०० मीटर उंचीवर कैलास मानसरोवर असून यासाठी भारताच्या विभिन्न राज्यांतून यात्रेकरू गेले आहेत. प्रत्येक वयोगटाचे प्रवासी यात आहेत. पहिल्या टप्प्यात २५० यात्रेकरू कैलासकडे रवाना होतील. चीनचे भारतातील राजदूत ले युचेइंग यांनी स्वत: भारतातून चीनच्या हद्दीत प्रवेश केला. यात्रेच्या वेळी उपस्थित राहणारे ते पहिले चिनी राजदूत आहेत. या वेळी बीजिंगमधील भारताचे प्रतिनिधी श्रीला दत्त कुमार यांचीही उपस्थिती होती. तिबेटी उच्चाधिकार्‍यांनीही भारतीय यात्रेकरूंचे स्वागत केले.

यात्रेकरूंनी व्यक्त केली कृतज्ञता : कैलास मानसरोवर यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. चिनी लष्कराने नवा व सोयीचा मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय यात्रेकरूंनी कृतज्ञता व्यक्त केली. चीनच्या सहकार्यामुळेच ही संधी उपलब्ध झाल्याच्या भावना यात्रेकरूंनी व्यक्त केल्या.

या वर्षी १ हजार ३३० यात्रेकरू नथू ला मार्गे कैलास यात्रा करतील, तर लीपुलेख मार्गे १ हजार ८० यात्रेकरू कैलासकडे रवाना होतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

ज्येष्ठांसाठी चांगल्या सुविधा
नथू ला पासची सोय झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. येथून मानसरोवरसाठी बसेसची सुविधा आहे. हिमालयात ऑक्सिजनचा स्तर कमी असल्यानेही हा मार्ग जिकिरीचा आहे. नथू ला ते कैलासदरम्यान १,५०० किलोमीटरचा बस प्रवास आहे. या मार्गावर हॉटेल, रस्ते, टूर गाइड्स, भारतीय जेवणाची सोय वाढवण्यात येईल, असा निश्चय ले युचेइंग यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या मार्गापेक्षा हा अधिक सुरक्षित मार्ग ठरेल. गेल्या दशकभरात ८० हजार यात्रेकरूंनी प्रचंड जोखमीने कैलास यात्रा केली आहे. चीन आता यात्रेकरूंच्या अडचणी दूर करणार असल्याची ग्वाही दूतावासाच्या अधिकार्‍यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...