आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाखमध्ये रस्त्याचे बांधकाम केल्यास डोकलामचा पेच वाढेल, चीनची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने ईशान्येकडील प्रदेशाला सुरक्षेच्या पातळीवर आणखी बळकट करण्यासाठी नवा हवाई तळ सुरू केला आहे. - Divya Marathi
भारताने ईशान्येकडील प्रदेशाला सुरक्षेच्या पातळीवर आणखी बळकट करण्यासाठी नवा हवाई तळ सुरू केला आहे.
बीजिंग - लडाखमधील पॅनगाँग तलावाजवळ रस्त्याचे बांधकाम करण्याचा भारताचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे डोकलामचा वाद आणखी वाढेल, अशी धमकी चीनने दिली आहे.  
 
सीमेच्या पश्चिमेकडील प्रदेशात भारताने रस्त्याचे बांधकाम करण्याची योजना आखली आहे. ती कदापिही स्वीकारली जाऊ शकत नाही. भारताचे हे पाऊल प्रदेशातील शांततेला धोका निर्माण करेल, असे चीनने म्हटले आहे. गृह मंत्रालयाने मारसिमिक ला ते हॉट स्प्रिंगपर्यंतच्या रस्त्याच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवला आहे. पॅनगाँग तलावापासून २० किलोमीटर अंतरावर मारसिमिक हे ठिकाण आहे. भारत आणि चीन यांच्यात पश्चिमेकडील प्रदेशात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून वाद आहे.

भारताचे पाऊल म्हणजे ‘स्वत:च्या मुखात मारून घेण्याचा’ प्रकार असल्यासारखे वाटू लागले आहे, असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे.  भारताची सीमेसंबंधीची काही विधाने विरोधाभासाची आहेत. भारताच्या बाजूने रस्त्याचे बांधकाम प्रादेशिक शांतता व स्थैर्यासाठी योग्य नाही. सध्याच्या डोकलाममधील संघर्षावर ही परिस्थिती अजिबात पूरक ठरत नाही. म्हणूनच पश्चिमेकडील प्रदेशातील चीन-भारत सीमेवर दाेन्ही बाजूने समेटाचे प्रयत्न हवेत. अन्यथा पेच वाढेल, अशी धमकी हुआ यांनी दिली. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही देशांत डोकलामवरून तणावाची परिस्थिती आहे.

ईशान्येत नवा हवाई तळ सुरू  
भारताने ईशान्येकडील प्रदेशाला सुरक्षेच्या पातळीवर आणखी बळकट करण्यासाठी नवा हवाई तळ सुरू केला आहे. डोकलाम तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल अत्यंत प्रभावी मानले जाते. कोलकात्यापासून १५० किलोमीटर अंतरावरील पनगड येथे हवाई दलाचा हा तळ आहे. हा तळ कोणत्याही परिस्थितीत कारवाई करण्यासाठी सज्ज आहे. या तळावर सी-१३० जे हे बहुद्देशीय विमान तैनात आहे. हिंदान (गाझियाबाद) अशा प्रकारचे विमान तैनाती असलेले हे दुसरे ठिकाण आहे. हे विमान अमेरिकी बनावटीचे आहे. पुढील दोन वर्षे अमेरिकेचे अभियंते, तंत्रज्ञांची भारताला मदत मिळणार आहे. त्याशिवाय इल्युशिन- ७८ हे विमानही तेथे सज्ज अाहे. मोहिमेवर असताना हवेतच इंधनाची व्यवस्था या विमानात आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...