Home »International »China» PLA To India Withdraw From Doklam To Avoid Confrontation

संघर्ष टाळायचा तर सैन्य हटवा; पीएलएचा इशारा, भारताकडे वेळ कमी असल्याची चिनी माध्यमांची धमकी

दिव्य मराठी वेब टीम | Aug 08, 2017, 03:48 AM IST

  • डोकलामवरून सैन्य माघारी घेणार नाही असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
बीजिंग/हुआरोऊ- चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) भारताला इशारा दिला आहे. भारताला संघर्ष टाळायचा असेल तर सैन्याने येथून माघार घेणे हाच पर्याय आहे. चीन सरकारच्या निमंत्रणावरून भारतीय माध्यम प्रतिनिधींच्या चमूने वरिष्ठ अधिकारी कर्नल ली ली यांच्याशी चर्चा केली. ली ली म्हणाले की, भारतीय सैन्य आमच्या हद्दीत शिरले आहे. आमच्या सीमेचे संरक्षण करणे आमचे आद्यकर्तव्य आहे. चीनचे सैन्य काय करेल हे भारतीय सैन्याच्या कारवाईवर निर्भर आहे. आवश्यकता भासल्यास कारवाई निश्चित करणार. चिनी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, डोकलाममध्ये अंदाजे ४८ भारतीय सैनिक बुलडोझरसह तैनात आहेत. सीमेजवळदेखील भारतीय सैन्याची छावणी आहे.

चीनच्या सरकारी माध्यमात प्रकाशित लेखात म्हटले आहे की, भारताला चीनच्या क्षमतेची जाणीव असली पाहिजे. शत्रूंना हरवण्याची क्षमता चीनमध्ये आहे. भारताकडे वेळ फार कमी असल्याची समजही या लेखांमध्ये दिली आहे. वेळीच भारताने चर्चेने हा मुद्दा सोडवणे योग्य ठरेल, असे यात म्हटले आहे. सीमेवर भारत तणाव वाढवत असून भारताची भूप्रदेश मापन क्षमता कदाचित कमी असावी. त्याचे भारताने पुनरावलोकन करावे, असा सल्ला माध्यमांनी दिला आहे.
भारतीय माध्यम प्रतिनिधींसमोर शक्तिप्रदर्शन
चीन सरकारच्या निमंत्रणावरून भारतीय पत्रकार उत्तर बीजिंगजवळील हुआरोऊ येथे गेले असता चीनच्या सैन्याने त्यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले. पीएलएची सैन्यसज्जता त्यांना दाखवण्यात आली. शस्त्रास्त्र व विविध अद्ययावत प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकेही भारताच्या माध्यम प्रतिनिधींना दाखवण्यात आली. डोकलामच्या तणावामुळे आपण शक्तिप्रदर्शन करत आहोत, असे माध्यम प्रतिनिधींनी मानू नये असे ली ली म्हणाले. संघर्ष टाळण्याचा एक सैनिक म्हणून आपण यथाशक्ती प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. आपण सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे आदेश पालन करण्यास बद्ध आहोत, मात्र बीजिंगजवळील हुआरोऊ हे सर्वात जुने लष्करी प्रशिक्षण केंद्र असल्याने भारतीय माध्यम प्रतिनिधींना ते दाखवले जात असल्याचे ली ली म्हणाले.

Next Article

Recommended