आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Governor Raghuram Rajan Commented On China Recession

चीनमधील आर्थिक मंदीचा भारतावर परिणाम, राजन यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनमध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. चीनमधील मंदी जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय असल्याचे राजन यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. आमची चीनची प्रत्यक्ष निर्यात कमी झाली आहे. चीनला निर्यात करणारे इतर देशदेखील आमच्याकडून कमी मालाची खरेदी करत असल्याचे राजन यांनी सांगितले.
भारतात कमोडिटीची आयात करण्यात येत असल्यामुळे कमोडिटी स्वस्त झाल्यास त्याचा भारताला फायदाच असल्याचे राजन यांनी सांगितले. चीनमधील मंदीचा आमच्यावर परिणाम कमी झाला तरीदेखील नुकसान तर झालेच असे त्यांनी सांगितले. चीनमधील मंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेला असल्यामुळे आमच्यावरदेखील परिणाम झाला आहे.

भारत आणि चीन यांच्यात वाढत असलेल्या परस्पर निर्भरतेचा इशारादेखील राजन यांनी िदला. पंतप्रधान शेजारील देशांसोबत असलेले नाते सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे पूर्ण लक्ष पूर्वेकडील देशांवर असून पश्चिमवर नाही. मग ती एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक असेल किंवा चायना सिल्क रोड, चीन आणि चिनी उत्पादनांसोबत आमचे संबंध वाढत जाणार आहेत. ते चीनसाठीदेखील फायदेशीर असल्याचे राजन म्हणाले.

भारतही चीनच्या जुन्या िवकासदरापर्यंत पाेहोचण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चीनमध्ये जे चांगले झाले त्यापासून आपण समजून घेतले पाहिजे. चीनमध्ये उत्पादन कसे यशस्वी झाले, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास कसा झाला, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात एफडीआय मिळवण्यात कसे यशस्वी झाले याचा आम्ही अभ्यास करायला हवा, असे राजन यांनी सांगितले.

भारत डोळे बंद करून चीनच्या रस्त्यावर चालू शकत नसल्याचा इशाराही राजन यांनी दिला. कारण चीननेही काही बदल केले आहेत. चीनने ज्या उद्योगात प्रावीण्य मिळवले आहे त्या उद्योगात पुढे जाणे आमच्यासाठी फायद्याचे राहील का, याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. काही क्षेत्रांत दोघांसाठी जागा असली तरी काही क्षेत्रांत नसेल.

राजन, जेटलींमध्ये विरोधाभास
राजन यांचे हे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मताशी विरोधाभासी आहे. चीनमध्ये आयात कमी झाली असली तरी त्याचा भारताशी संबंध नसल्याने आमच्यावर परिणाम होणार नसल्याचे मत जेटली यांनी व्यक्त केले होते. जागतिक विकास साध्य करण्यासाठी भारत अतिरिक्त खांबाप्रमाणे काम करू शकतो, असेही जेटली म्हणाले होते.