आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानने चीनचा भाग समजावे, नंतरच संधी मिळेल : जिनपिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीन आणि तैवानच्या राजकीय नेत्यांमध्ये सोमवारी ६५ वर्षांनंतर प्रथमच थेट चर्चा झाली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशांमध्ये राजकीय पक्षांच्या समान स्तरावर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, त्यासाठी आधी तैवानने स्वत:ला चीनचा भाग समजावे ही अट घातली आहे. तसे झाल्यास चीन आर्थिक आघाडीवर वेगाने पुढे जात असल्यामुळे तैवानच्या नागरिकांनाही जास्त आर्थिक संधी उपलब्ध होतील. चीनची गेल्या अनेक वर्षांपासूनची अट आहे. मात्र, तैवानमध्ये बहुमत त्याविरोधात आहे.

तैवानच्या सत्तारूढ नॅशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष एरिक चू यांनी सोमवारी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख शी जिनपिंग यांच्याशी बीजिंगच्या ग्रेट हाॅल ऑफ द पीपुलमध्ये चर्चा केली. चीनसोबत व्यापारी संबंध वाढवण्यासाठी तैवानचे शिष्टमंडळ सध्या चीन दौ-यावर आहे. चीनने तैवानला आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनेत जास्त भागीदारी मिळेल,असे म्हटले आहे. चीनने आतापर्यंत त्यास विरोध केला होता. तैवान एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचा सदस्य होऊ इच्छितो. भारतासह ५७ देश त्याचे संस्थापक सदस्य आहेत. चीन बँकेचा अध्यक्ष आहे. त्यांनी तैवानला संस्थापक सदस्य होण्यापासून अडवले होते.

चीनकडे कल आणि तैवानमध्ये विरोध
चीन तैवानला आपला भाग मानतो. मात्र, तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानत आहे. १९४९ मध्ये गृहयुद्धानंतर चीनवर कम्युनिस्ट पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले आणि तेथील शासक च्यांग काई शेकला तैवानमध्ये पळून जाणे भाग पडले होते. तेव्हापासून दोघांमध्ये वाद आहे. तैवानच्या सत्तारूढ नॅशनलिस्ट पार्टीचा कल चीनच्या बाजूने आहे. मात्र, गेल्या मार्चमध्ये हजारो तरुणांनी चीनसोबतच्या व्यापारी संबंधाला विरोध करत तैवानच्या संसदेवर आंदोलन केले होते. नोव्हेंबरमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नॅशनलिस्ट पार्टीला याचा फटका बसला होता.