आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये जगातील पहिला मानवविरहित कारखाना, रोबोटच्या माध्यमातूनच सर्व काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - तंत्रज्ञान क्षेत्रात पुन्हा एकदा चीनने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खेळणी तसेच मोबाइल जगतात अत्यल्प किमतीत दर्जेदार उपकरणांच्या निर्मितीमुळे या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनने रोबोटिक क्षेत्रातही मुसंडी मारली आहे. जगातील पहिला मानवविरहित कारखाना उभारण्याचा बहुमान चीनला मिळाला आहे. या कारखान्यातील प्रत्येक काम संगणकाद्वारे नियंत्रित रोबोटच्या हाती सोपवण्यात आले आहे. हे रोबोट कारखान्यातील एखादी वस्तू हलवण्यापासून ते ट्रकमधून वाहतूक करण्यापर्यंतची सर्व कामे करतात. चीनच्या डांग्गुआनमध्ये चँगिइंग प्रिसिझन टेक्नाॅलॉजी कंपनीचा "वर्ल्ड फॅक्टरी' नावाचा कारखाना असून या ठिकाणी मोबाइल तसेच त्याच्याशी संबंधित उपकरणे तयार केली जातात. मानवी कौशल्यांशी या रोबोटची तुलना केल्यास हे मानवांपेक्षाही सरस असल्याचे आढळून आले आहे. कामांची अचूक माहिती नसली तरी रोबोट हे प्रशिक्षित आणि तज्ज्ञ मनुष्यबळापेक्षा उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादन तयार करत आहेत.

अशी आहे कार्यप्रणाली
सध्या या ठिकाणी ६० रोबोट कार्यरत आहेत. हे रोबोट दिवस- रात्रीच्या पाळीत १० प्रॉडक्शन लाइन्सवर कार्यरत असतात. प्रत्येक लाइनवर ऑटोमेटिक बेल्ट लावण्यात आलेले असून रोबोटवर लक्ष ठेवण्यासाठी फक्त तीन लोक तैनात करण्यात अाले आहेत. काही महिन्यांपूर्वी याच कामासाठी सुमारे ६५० लोक लागायचे.

आठ लोकांच्या जागी एक रोबोट
कंपनीचे महाव्यवस्थापक लुओ वेइजियांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक रोबोट आठ लोकांचे काम करण्यास सक्षम आहे. आधी कंपनीत ६५० लोक कार्यरत होते. आता ती संख्या ६० वर आली असून भविष्यात ती २० वर आणण्याचा प्रयत्न अाहे. "मानवाच्या जागी रोबोट' या संकल्पनेचे हे प्रारंभीचे पाऊल आहे. पुढच्या दोन वर्षांत या ठिकाणी रोबोटची संख्या १ हजार करण्यात येईल आणि कंपनीचे ८० टक्के कार्य त्यांच्याच माध्यमातून केले जाईल, असेही ते म्हणाले.

चुकांचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले
कंपनीत उपलब्ध तथ्यांनुसार, जेव्हापासून मानवाच्या जागी रोबोट कार्यरत करण्यात आले आहेत तेव्हापासून उत्पादनांतील चुकांचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहेत. आधी येथे दरमहा ८ हजार उपकरणांची निर्मिती व्हायची, ती आता २१ हजारांवर पोहोचली आहे.