Home | International | China | Xi Jinping selected as president of china

माआेवादानंतर आता जिनपिंगवाद, सीपीसी काँग्रेसमध्ये शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था | Update - Oct 25, 2017, 05:34 AM IST

चीनच्या सत्ताधारी कम्यूनिस्ट पार्टीने मंगळवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दुसऱ्या ५ वर्षांच्या कार्यकाळावर शिक्का

 • Xi Jinping selected as president of china
  बीजिंग - चीनच्या सत्ताधारी कम्यूनिस्ट पार्टीने मंगळवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दुसऱ्या ५ वर्षांच्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब केले आहे. जिनपिंग यांची विचारप्रणाली पक्षाच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली असून त्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या घटनेत शी जिनपिंग यांच्या नावाचा समावेश करणे म्हणजेच त्यांना पक्ष संस्थापक माआे त्सेतुंग आणि त्यांचे राजकीय वारसदार डेंग शीआपिंग यांचा दर्जा देण्यासारखे आहे.

  ‘नवयुगासाठी चिनी मूल्यांवर आधारित समाजवाद’(socialism with Chinese characteristics for a new era) ही संकल्पना शी जिनपिंग यांनी मांडली आहे. याचा समावेश आता पक्षाच्या घटनेत करण्यात आलाय. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) च्या काँग्रेसचा समारोप झाला. दर ५ वर्षांनी ही सर्वसाधारण सभा होत असते. सीपीसीच्या घटनेत जिनपिंग यांची विचारप्रणाली स्वीकारण्यात आली असून आगामी काळात या दिशानिर्देशांवर सत्ताधाऱ्यांची वाटचाल सुरू राहील, असे १९ व्या राष्ट्रीय अधिवेशनात घोषित करण्यात आले. यापूर्वी पक्षाच्या घटनेत माआे आणि डेंग यांच्या विचारधारांचा समावेश करण्यात आला होता.

  सीपीसी राष्ट्रीय अधिवेशनानंतर झालेल्या बैठकित शी यांनी पक्ष प्रतिनिधींना संबोधित केले. ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे ही बैठक झाली. चीनच्या जनतेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे या वेळी बोलताना जिनपिंग म्हणाले. आपली पुनर्निवड ही अभिमानाची बाब असून त्यापेक्षाही अधिक जबाबदारीची बाब असल्याचे ते म्हणाले. या वेळी ग्रेट हॉलमध्ये २,३०० सदस्यांची उपस्थिती होती. सीपीसीने या राष्ट्रीय अधिवेशनात नव्या केंद्रीय समितीची निर्मिती केली आहे. येत्या ५ वर्षांत ही समिती सर्वाधिक शक्तिशाली असेल. पॉलिट ब्युरो सदस्यांची नाम निश्चितीदेखील ही समिती करेल.
  भारत-चीन सीमावादाविषयी काम करणाऱ्या राजनयिकांना प्राधान्य ?
  - चीनमधील उच्चाधिकारी आणि भारत-चीन सीमावादाविषयी काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) केंद्रीय समितीमध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यांना निवृत्त करण्यात येईल, अशा शंका व्यक्त करण्यात येत असतानाच आता त्यांना चीनमधील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या सीपीसीच्या केंद्रीय समितीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या सर्व चर्चांना विराम मिळाला आहे. यांग जेईची (६७) आणि परराष्ट्रमंत्री वांग यी (६४) यांची गच्छंती होऊ शकते इथपर्यंत भाकिते वर्तवण्यात आली होती. मात्र, आता २०४ सदस्य असणाऱ्या सीपीसीच्या केंद्रीय समितीत त्यांना निवडण्यात आले आहे. दर ५ वर्षांनी सीपीसीची महासभा होते. यात हा निर्णय घेण्यात आला. भारतातील चीनचे माजी राजदूत ली युचेंग यांची १७२ वैकल्पिक सदस्यांत निवड झाली आहे. यांग जेईची हे चीनचे माजी परराष्ट्र मंत्री असून ७३ दिवस चाललेल्या डोकलाम वादामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. २८ ऑगस्ट रोजी हा तणाव निवळला होता. बुधवारी सीपीसीच्या पॉलिट ब्युरोतील २५ सदस्यांच्या नावांची घोषणा होणार आहे. यापैकी ७ जण स्थायी समिती सदस्य असतील. ही समिती चीनमधील सर्वोच्च सत्ता असणारी समिती मानली जाते, तर पॉलिट ब्युरोतील सदस्य राजकीयदृष्ट्या सर्वात बलशाली असतात. यामध्येदेखील यांग जेईची यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पॉलिट ब्युरोमध्ये यांग यांची निवड झाली तर त्यांना उपपंतप्रधान पद देण्यात येईल. वांग यी यांना स्टेट कौन्सिलर पद मिळाले तर मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या भारत-चीन सीमा चर्चेत ते चीनचे प्रतिनिधित्व करतील.
  यांग जेईची, वांग यी, ली युचेंग यांची भूमिका निर्णायक
  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी सिल्क रोड प्रकल्पाच्या यशासाठी यांग जेईची, वांग यी, ली युचेंग हे तिघे निर्णायक भूमिका बजावतील, असा विश्वास सीपीसीला आहे. अमेरिकेची आर्थिक एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी सिल्क रोड प्रकल्पावर चीनने अब्जावधींची गुंतवणूक केली आहे.
  ली केकियांग द्वितीय सर्वोच्च नेतृत्व
  ६२ वर्षीय पंतप्रधान ली केकियांग हे पक्षातील स्थानानुसार देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाेच्च नेतृत्व असेल. ५ नव्या सदस्यांची निवड बुधवारी होणार आहे. ७ सदस्यीय स्थायी समितीसाठी ही निवडणूक आज होईल. देशातील ही समिती सर्वात शक्तिशाली असेल. २०१२ मध्ये जिनपिंग आणि केकयांग यांनी सत्तासूत्रे हाती घेतली होती. २०२२ पर्यंत ते या स्थानी असतील. माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताआे व जियांग झमिन यांची स्वत:ची विचारप्रणाली होती. मात्र माआे व डेंग नंतर जिनपिंग यांनाचा इतका सन्मान मिळाला.

Trending