आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करात मोठे फेरबदल, शी यांची पकड मजबूत ; दुसऱ्या कार्यकाळासाठी जिनपिंग यांचे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चीनच्या लष्करातील अव्वल पदांमध्ये मोठे फेरबदल केले आहे. १८ ऑक्टोबर रोजी कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसपूर्वी लष्करात स्वत:चे स्थान अधिक बळकट करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. 

जिनपिंग यांनी जनरल फांग फेंघुई यांची केंद्रीय लष्करी आयोगाच्या (सीएमसी) संयुक्त विभागप्रमुख पदावरून व जनरल झांग यांग यांची पीएलच्या राजकीय विभागाच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी केली. फांग यांच्या जागी जनरल ली झुओचेंग आणि झांग यांच्या जागी अॅडमिरल मिआओ हुआ यांना प्रमुख बनवले आहे. झुओचेंग व मिआओ हे जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१५ मध्ये जिनपिंग यांनी ली झुओचेंग यांची जनरलपदी, तर मिआओ यांची नौदलाच्या जनरलपदी पदोन्नती केली होती.   

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची १९वी काँग्रेस (परिषद) १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परिषदेत जिनपिंग यांनाच राष्ट्रपतिपद देण्यावर शिक्कामोर्तब होईल. सध्या त्यांचा दुसरा कार्यकाळही निश्चित आहे. मात्र, परिषदेत निवडीची औपचारिकता पार पडली जाणार आहे. पीएलए या चिनी लष्कराचे नियंत्रण सीएमसीकडे असते. त्याच्या अव्वल ११ सदस्यांमध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग हे प्रमुख आहे. या सदस्य मंडळात ते एकमेव नागरिक आहेत. उर्वरित सर्व लष्करी अधिकारी आहेत.
 
 
जिनपिंग दुसऱ्यांदा चीनचे राष्ट्रपती होणार   
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने आगामी परिषदेसाठी २,२८७ प्रतिनिधींची निवड केली आहे. या प्रतिनिधींच्या मतदानातून जिनपिंग यांची दुसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड निश्चित आहे. या वेळी ते अनेक नवीन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करतील. मागील पाच वर्षांत शी जिनपिंग हे चीनच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली नेत्याच्या रूपात पुढे आले आहेत. त्यांच्याकडे देशाच्या सर्वोच्च पदासोबत सत्ताधारी पक्षाचे नेतृत्वही आहे. शिवाय, ते पीएलएचे सर्वोच्च लष्करी कमांडरही आहेत.
बातम्या आणखी आहेत...