इस्तानबूल - तुर्कीमध्ये इस्तंबूलच्या मुख्य पर्यटन केंद्रावर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये १० जण ठार, तर १५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक सुलतान अहमत चौकावर शक्तिशाली स्फोट झाला. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात.
इस्तंबुलच्या गव्हर्नर कार्यालयाने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, दोषींचा शोध घेतला जात आहे. स्फोटाच्या प्रकारातून यामागच्या अतिरेक्यांचा शोध लावला जाईल. कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
पंतप्रधान अहमत देवूतोग्लू यांनी स्फोटानंतर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये गृहमंत्री एफकान अाला आणि गुप्तचर संस्थेचे प्रमुख हकन फिदान यांचा समावेश आहे. तुर्कीमध्ये कुर्द, डावे आणि इस्लामिक दहशतवादी हल्ला करतात. तुर्की इस्लामिक स्टेटच्या निशाण्यावर आहे. गेल्यावर्षी सिरिया सीमेवर जवळील सुरुक शहर आणि राजधानी अंकारातील स्फोटात १०० हून जास्त लोक मारले गेले होते.
पॅरिस : बेपत्ता अब्देसलामचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले
पॅरिस | १३ नोव्हेंबर रोजी पॅरिसवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यातील संशयित दहशतवादी सालाह अब्देसलामची सीसीटीव्ही छायाचित्रे समोर आली आहेत. फ्रान्सची दूरचित्रवाहिनी बीएफएमच्या वृत्तानुसार, ही छायाचित्रे हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी फ्रान्समधील पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मिळाली आहेत. पेट्रोलपंप फ्रान्स बेल्जियम सीमेजवळ आहे. पॅरिस हल्ल्यात १३० नागरिकांचा मृत्यू तर ३५० जण जखमी झाले होते. छायाचित्रात अब्देसलाम एका व्यक्तीसोबत खिशात हात घालून शांतपणे फिरत असल्याचे दिसते. अब्देसलामसोबत दिसणारा दुसरा व्यक्ती सालाह हम्ज अताऊ आहे. सालाह हम्जला बेल्जियमध्ये अटक करण्यात आली तर अब्देसलाम बेपत्ता होता.
आत्मघाती हल्ल्यात चार ठार
बाक्वा । उत्तर बगदादमध्ये आत्मघाती हल्लेखोराने स्फाेटकांनी भरलेल्या कारचा स्फोट केला. यात चार पोलिस ठार तर एक गुप्तचर अधिकारी जखमी झाला. हल्लेखोराने कर्नल कासीम अल अन्बाकीच्या ताफ्यावर हल्ला चढवला. जदिदत अल-शत भागात झालेल्या आणखी एका स्फोटात चार पाेलिस ठार तर नऊ जखमी झाले.