आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियात १० वर्षीय मुलीचा आत्मघातकी हल्ला, १६ ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुजा - रविवारचा हल्ला ताजा असतानाच नायजेरियातील दामातुरू शहरात सोमवारी पुन्हा आत्मघातकी हल्ला झाला. त्यात १६ जण ठार झाले. १० वर्षीय मुलीने स्वत:ला उडवून लावल्याचे उघड झाले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा हादरली आहे.

योब राज्यातील दामातुरू शहरात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी बाजारपेठेला लक्ष्य केले. त्यात ५० जखमी झाले. सायंकाळपर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नव्हती; परंतु हल्ल्यामागे बोको हरम गट असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. रविवारीदेखील नायजेरिया शेजारी देश असलेल्या कॅमेरूनमधील आत्मघातकी हल्ल्याने हादरले होते. अाफ्रिकन देश कॅमेरूनच्या उत्तरेकडील मारुआ शहरात रविवारी १२ वर्षांच्या मुलीने आत्मघातकी स्फोट घडवला होता. त्यात २० जणांचा मृत्यू झाला होता. मुलीने दोन खिडक्यांसमोर असलेल्या लोकांच्या लांब रांगांमध्ये जाऊन स्वत:ला स्फोटकांनी उडवले. मारुआ शहर हे उत्तर कॅमेरूनमध्ये मोठे व्यापारी केंद्र आहे. बुधवारी येथे दोन मुलींनी आत्मघातकी स्फोट घडवला होता. महिन्याच्या सुरुवातीलादेखील दोन महिलांनी आत्मघातकी स्फोट घडवला. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता.

गर्दीत घडवला स्फोट
सदर मुलीने सोमवारी बाजारपेठेतील गर्दीत प्रवेश करत स्फोटकांना उडवले. त्यामुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात झाला, असे सुरक्षा अधिका-यांनी सांगितले. १७ जुलै रोजी दोन महिलांचा समावेश असलेला हल्ला झाला होता. ईदच्या दिवशी हा हल्ला झाला होता.

‘बोको हरम’ बिथरले
नायजेरियन सरकारने कट्टरवादाला संपुष्टात आणण्यासाठी शेजारील देशांच्या सुरक्षा यंत्रणेेचे सहकार्य घेण्यास सुरुवात केली आहे. ही बाब बोको हरम या दहशतवादी संघटनेला आवडलेली नाही. त्यावरून संघटनेने आपली नाराजी मांडण्यास सुरुवात केली.

सुरक्षा यंत्रणेचे यश
बोको हरमच्या दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यात सरकारी फौजांना चालू वर्षात तुलनेने ब-यापैकी यश आले होते. त्यामुळे संघटना बिथरल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच हल्लेसत्र सुरू ठेवण्यात आले आहे.

पाश्चात्त्य शिक्षणाच्या विरोधातून जन्म
नाजयेरियातील बोको हरम गटाची सुरुवात पाश्चात्त्य शिक्षणाला विरोध करण्याच्या उद्देशातून झाली होती. २००२ मध्ये ही संघटना सुरू झाली. त्यानंतर मात्र २००९ मध्ये संघटनेने आपल्या दहशतवादी कारवाया सुरू केल्या. २०० हून अधिक शालेय मुलांचे अपहरण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर बोको हरमने इस्लामिक स्टेटशी हातमिळवणी केली. उत्तर-पूर्वेकडील मोठा भूप्रदेशही ताब्यात घेतला.