आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 100 People Missing After The Blast In Tianjin, China

तिआनजिन स्फोटानंतर चीनमध्ये १०० जण बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिआनजिन - चीनमध्ये चार दिवसांपूर्वी तिआनजिन शहरात झालेल्या स्फोटानंतर जवळपास १०० जण बेपत्ता असल्याचे उघड झाले आहे. गोदामातील घातक रसायनांच्या दुहेरी स्फोटातील मृतांची संख्या ११२ झाली आहे. मृत आणि बेपत्ता नागरिकांमध्ये अग्निशमन दल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बुधवारच्या स्फोटानंतर ७२२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ५८ जणांची प्रकृती गंभीर आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये ८५ अग्निशमन जवान आणि १० नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. रविवारी सकाळपर्यंत मृतांची संख्या ११२ वर पोहोचली. पंतप्रधान ली कियांग यांनी घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती शिन्हुआच्या वृत्तात आहे. आग विझवण्यासाठी गेलेल्या पहिल्या तुकडीतील २१ जवानांचा मृतांमध्ये समावेश आहे. स्फोटापूर्वी आग वेअर हाऊसपर्यंत पोहोचू नये यासाठी हे जवान तिथे पोहोचले होते. स्फोट एवढा मोठा होता की त्यात मृत व्यक्तींचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले. अधिकाऱ्यांनी नव्याने स्फोट होण्याची शक्यता फेटाळली आहे. शनिवारी आसपासच्या परिसरात लहान स्फोट झाले.

वेबसाइट बंद : या दुर्घटनेत साधारणत: ४७ जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख झोऊ तियान यांनी सांगितले. तिआनजिनमध्ये कार्यरत एक भारतीय कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बेपत्ता नागरिकांबाबत विस्तृत माहिती देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, अफवा पसरल्याच्या कारणावरून डझनभर वेबसाइट्स आणि सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले आहेत.

सोडियम सायनाइड
सोडियम सायनाइड रसायन असलेल्या ठिकाणी हा स्फोट झाला. खाणीत सोन्याचे घटक गोळा करण्यासाठी या रसायनाचा उपयोग केला जातो. हे रसायन जळाल्यानंतर किंवा अन्य रसायन, पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यातून घातक वायू बाहेर पडतो.

११०० जवानांकडून शोध
जीवितांच्या शोधासाठी शनिवारी पहिल्यांदाच रसायनविरोधी विशेष प्रशिक्षित ७० जवानांनी स्फोटाच्या मुख्य भागात प्रवेश केला. याशिवाय जीवितांना शोधण्यासाठी ११०० जवानांनी आसपासच्या परिसराची झडती घेतली आहे. हवा आणि पाण्यातील प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.