भूकंपाच्या प्रलयानंतरही एव्हरेस्टच्या चढाईची ओढ चकित करणारीच. एव्हरेस्टचा कडा भूकंपाने भले हादरला, पण गिर्यारोहकांची जिद्द तसूभर कमी झाली नाही. ११८ गिर्यारोहक हजारो अडचणींना तोंड देत एव्हरेस्ट चढाईसाठी काठमांडूत ठाण मांडून आहेत.
वाताहतीला आव्हान देणारे हे आकडे जरा लक्षपूर्वक पाहा. मार्चपासून मेपर्यंत पहिल्या हंगामात १८ देशांच्या ३५८ गिर्यारोहकांची एव्हरेस्ट चढाई नियोजित होती. भूकंपाच्या दिवशी २५ एप्रिल रोजी कॅम्प ३ वर ३० गिर्यारोहकांचा चमू दाखल झाला होता. तेथेच बेस कॅम्पवर दोनशेहून अधिक गिर्यारोहक वेळ येण्याची वाट पाहत होते. भूकंपानंतर आलेल्या हिमस्खलनाने कॅम्पमधील २२ गिर्यारोहकांचे बळी घेतले. काही अजून बेपत्ता आहेत. एवढी वाताहत व मृत्यूनंतरही ११८ गिर्यारोहक काठमांडूला परतले, पण वातावरण निवळताच पुन्हा एव्हरेस्ट फत्ते करण्याच्या तयारीत आहेत. अर्थात सरकारने अजून परवानगी दिलेली नाही. एवढेच नव्हे, तर एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी ९ हजार जणांनी नोंदणी केली आहे. यातील ३५०० लोकांनी भूकंपानंतर विविध संस्थांत नावे नोंदवली आहेत.
भूकंपानंतरही शिखरावर सर्वांत आधी पोहोचण्याचीच जिद्द नाही, तर तेथे जाण्यासाठी असलेल्या १५ मार्गांवर सर्वांत धोकादायक मानल्या जाणा-या पाच मार्गांनी जाण्याचीही महत्त्वाकांक्षा आहे. जिवंतपणी मोक्ष मिळण्याएवढीच एव्हरेस्ट फत्ते करण्याची ओढ गिर्यारोहकांत आहे. नेपाळ टुरिझमचे वरिष्ठ अधिकारी विजय थापा सांगतात, हंगाम अजून संपलेला नाही, स्थगित झाला आहे. पहाडांवर ऋतू प्रत्येक वेळी नवे जीवन घेऊन येतो. वाताहतीनंतर येथेही चैतन्य परतेल. एव्हरेस्टचा प्रत्येक हंगाम नेहमी रोमांचक आणि रहस्यमय असतो. एव्हरेस्टची विशालता आणि विविधता प्रत्येक गिर्यारोहकाला खुणावत असते. ते त्याचे स्वप्न असते.
सलग दुसरी संधी गमावणार नाहीत
>१८ देशांतील ३५८ गिर्याराेहकांना पहिल्याच सत्रात एव्हरेस्टवर जायचे हाेते.
>२५ एप्रिल राेजी हिमस्खलन. बेस कॅम्पवरच २२ गिर्याराेहकांचा मृत्यू.
भूकंपानंतर
एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी
3500 रजिस्ट्रेशन
>गतवर्षी १८ एप्रिलला एव्हरेस्टवर हिमस्खलन. १८ गाइडचा मृत्यू. सत्र रद्द करावे लागले.
गिर्यारोहक बर्फाच्छादित आव्हानांना भीत नाही. दैव, दुर्दैव साेबत घेऊन कूच करतो.
विजय प्रधान, एव्हरेस्ट माेहिमेत तीन वेळा सहभागी
एव्हरेस्ट प्रत्येक वेळी गिर्याराेहकांची परीक्षा घेतो. आम्ही यंदा यशस्वी हाेणारच.
- अॅन्ड्रयू कामिन, एव्हरेस्टवीर अमेरिकी गिर्याराेहक
एका आठवड्यात आम्ही एव्हरेस्टकडे जाणा-या रस्त्यांची दुरुस्ती करू.
- तुलसी गाैतम, डायरेक्टर जनरल, नेपाळी टुरिझम
पुढे वाचा, १०१ वर्षीय फांचू १६८ तासांनी ढिगाऱ्याखालून सुखरूप निघाले