रिओ ब्रावो (ग्वाटेमाला) - उत्तर अमेरिकेच्या ग्वाटेमाला येथे जमावाने एका 16 वर्षीय तरुणीला बेदम चोप दिला. भर रस्त्यात तिला लाथा-बुक्यांनी तुडवले. कोणी तिचे केस धरुन ओढत होता तर, कोणी श्रीमुखात भडकवत होता. यात लहान मुले आणि महिलाही मागे नव्हत्या. जमावाचा पाशवीपणा व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. 23 मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल साइटस् आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर हे प्रकरण ट्विटरवरही ट्रेंड करत आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता, मात्र नंतर तेथून काढून घेण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत. जमावाच्या तावडीत सापडलेल्या तरुणीची ओळख पटू शकलेली नाही.
काय आहे प्रकरण
या अनामिक तरुणीवर 68 वर्षांच्या कार्लेस एनरीक गोन्झालेज नॉर्जिया या टॅक्सी ड्रायव्हरला लुटण्याचा आणि त्याची हत्या करण्याचा आरोप जमावाने केला होता. कथितरित्या तरुणी एका बायकर गँगसोबत होती. त्यांनीच टॅक्सी ड्रायव्हरला लुटले आणि त्याची हत्या केली होती. घटनेनंतर तेथून पसार होताना तरुणी जमावाच्या तावडीत सापडली आणि त्यानंतर त्यांनी तिला अर्धमेली होईपर्यंत चोप दिला आणि नंतर जिवंत पेटवून दिले. या घटनेवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असताना जमावाने त्यांना पिटाळून लावल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सर्वात जास्त क्लेशदायी होती, की लहान मुले आणि महिलाही अल्पवयिन तरुणीला मारत होते आणि त्यांच्यासमोरच तिला जिवंत जाळण्यात आले. पण कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.