आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या शाळेत गृहपाठ नव्हे, ध्यान वर्ग होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - शाळेत मुलांसाठी ध्यान वर्ग असावेत, एक-दोन तासिकांनंतर चालण्याचे सत्र असावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला होमवर्क दिले नाही तर काही हाेईल? प्रत्येक विद्यार्थ्याला ती आपल्या स्वप्नातील शाळा वाटू लागेल. ब्रिटनमधील एक प्रतिष्ठित विद्यालय आता याच मार्गाने अध्यापन करणार आहे.
ब्रिटनच्या ग्लुसेस्टरशायरच्या चेलटॅनहॅम महिला महाविद्यालयाने हे पाऊल उचलले आहे. मुलांमध्ये नैराश्य आणि इतर मानसिक व्याधी निर्माण होऊ नये, म्हणून शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. मुलांना चांगले ग्रेड मिळावेत. त्याचबरोबर तंदुरुस्तदेखील असले पाहिजेत, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका इव्ह जार्डाइन यंग म्हणाल्या, मुलांच्या भल्यासाठी होमवर्कची परंपरा बंद केली जाणार आहे. १६२ वर्षे जुन्या शाळेत सप्टेंबरपासून आठवड्याला ध्यान वर्ग सुरू होणार आहेत. वेगवेगळ्या विषयाच्या वर्गानंतर त्यांचे वॉकिंग सेशनदेखील घेतले जाणार आहे. शिक्षकांनादेखील मुलांची मानसिकता समजून घेण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. इव्ह म्हणतात, साठच्या दशकात तणाव वाढीचे सरासरी वय २९ वर्षे होते. परंतु आता त्यात घट होऊन १५ च्या जवळपास आले आहे. आपले विद्यार्थीदेखील याच वयाचे असतात.
नैराश्य हे समाजात एखाद्या महामारीसारखे पसरू लागले आहे. देशाच्या भवितव्य असलेल्या नवी पिढीला बळकट करणे, ही शिक्षकांची जबाबदारी असते. त्यादृष्टीनेच हा आमचा प्रयत्न आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. संबंधित विषयाच्या वर्गाअगोदर मुलांनी त्या विषयाचे वाचन करूनच वर्गात हजेरी लावावी, अशी व्यवस्था आम्ही करत आहोत. त्यातून विषयाचे आकलन करणे सोपे होऊ शकेल. यापुढे मात्र विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जाणार नाही.
बर्कशायरचे वेलिंग्टन कॉलेजचे हेड टीचर अँथनी सेल्डन म्हणाले, मानसिक आरोग्य बिघडणे ही ब्रिटनच्या शालेय विद्यार्थ्यांमधील सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे हे पाऊल निश्चितच आशादायी म्हटले पाहिजे. त्याचबरोबर होमवर्क बंद केल्याने त्यावर तोडगा निघेल का? असा सवालही त्यांनी केला आहे. आपण मुलांना चिंता आणि तणावापासून एकदम दूर ठेवू नये. मोठे झाल्यानंतर त्यांना याच गोष्टींचा मुकाबला करायचा असतो. म्हणूनच त्यांना आतापासूनच या गोष्टींचा मुकाबला करण्यास तयार करायला हवे.