रियाध - सौदी अरेबियाच्या येमेनवरील हवाई हल्ल्यांत २० भारतीय मारले गेले आहेत. त्यांचा अधिक तपशील मिळू शकला नाही. तेल तस्करांवर हा हल्ला करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शी व स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार येमेनच्या होदैदा बंदरावर मंगळवारी हा हल्ला झाला. दरम्यान, या वृत्ताची खातरजमा केली जात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
बंदराच्या अल खोखा भागात हल्लेखोरांनी दोन नौका लक्ष्य केल्या. स्वतंत्र येमेनी सूत्रांनुसार हल्ल्यात येमेनचे १२ शिया बंडखोरही मारले गेले आहेत. सौदीचे लष्कर येमेनमध्ये बंडखोरांच्या विरोधात कायम हल्ले करत आहे. गेल्या आठवड्यात बंडखोरांच्या हल्ल्यात यूएईचे ४५ जवान मारले गेले होते. मंगळवारी येथे २० हल्ले झाल्याचे बंडखोरांच्या हाऊती गटाच्या प्रवक्त्याने सांगितले.