आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेनफेल टॉवर अग्निकांडात बळींची संख्या गेली 17 वर, उच्‍चस्‍तरीय चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पश्चिम लंडनमधील २४ मजली इमारतीतून अद्यापही धूर निघत आहे. मृतांचा आकडा १७ वर गेल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आग पूर्णत: विझविल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. मृतांचा आकडा अजूनही वाढण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.
 
इमारतीमध्ये अद्यापही कोणी जीवित आढळू शकते अशी आशा बचाव पथकाने वर्तवली आहे. ग्रेनफेल टॉवर आणि लॅटिमर रस्त्यावर अद्यापही रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांची रीघ दिसून येत आहे. आग लागली तेव्हा या इमारतीत ६०० निवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या निवासी संकुलात १२० सदनिका आहेत. आग लागली तेव्हा बहुतांश लोक झोपेत होते. इमारतीत शिरणे अद्यापही सुरक्षित नसल्याचे लंडनच्या अग्निशमन आयोगाचे प्रमुख डॅनी कॉटन यांनी सांगितले.

डॅनी कॉटन यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की इमारतीत आणखी मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. पैकी कोणी जिवंत असण्याच्या शक्यता क्वचित आहेत. महानगर पोलिस कमांडर स्टुअर्ट मुंडी यांनीदेखील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ७४ जखमींवर उपचार सुरू असून १८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
 
गेल्या वर्षी १० दशलक्ष पाउंड केला होता खर्च :  ग्रेनफेल इमारतीच्या डागडुजीसाठी गेल्या वर्षी १० दशलक्ष पाउंड खर्च करण्यात आले होते. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. रेडॉन या बांधकाम फर्मने आपल्या संकेतस्थळावर इमारतीच्या कामाचे विवरण जाहीर केले आहे. २०१६ च्या उन्हाळ्यात हे काम केल्याचे यात म्हटले आहे. सर्व सुरक्षा सुविधांची पडताळणी केल्याचा दावा रेडॉनने केला आहे.

आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल : थेरेसा मे  
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितले की, आग लागण्याच्या कारणाचा रीतसर तपास केला जाईल. आग इतक्या झपाट्याने कशी पसरली हेदेखील अद्याप गूढच आहे. डाऊनिंग स्ट्रीट येथे थेरेसा यांनी माध्यमांशी यासंबंधी बातचीत केली. मानवी चुकीमुळे जर हे घडले असेल तर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

१ दशलक्ष पाउंडचा मदतनिधी
ग्रेनफेल टॉवरमधील बळींना आणि जखमींना मदतीसाठी १ दशलक्ष पाउंडचा मदतनिधी उभारणार असल्याचे पंतप्रधान मे यांनी सांगितले. धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवकांनादेखील बेघर लोकांना आश्रय देण्याचे आवहान केले आहे. गुरुद्वारा, चर्च, मशिदींनीदेखील पीडितांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ब्रिटिश शीख स्वयंसेवक भूपिंदरसिंग यांनी सांगितले की, हा लंडनवरची आपत्ती असून जखमींना उदारतेने मदत केली जाईल.
 
बातम्या आणखी आहेत...