आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदानमधील संघर्षात 300 बळी, बॉम्बस्फोटांनी राजधानी हादरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुबा - दक्षिण सुदान पुन्हा एकदा यादवीच्या उंबरठ्यावर आहे. देशाची राजधानी झुबा येथे अध्यक्ष साल्वा कीर मयार्दित आणि उपाध्यक्ष रिएक माचर टेनी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या सैनिकांमध्ये उसळलेल्या संघर्षात पाचव्या दिवशी ३०० जण ठार झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी गोळीबार आणि तोफांचेच आवाज ऐकू येत आहेत. त्यामुळे भेदरलेल्या नागरिकांना आपापल्या घरातच लपून बसावे लागत आहे.

राजधानीतील तोंपिंग भागात सकाळी नऊ वाजता एक मोठा स्फोट झाला. त्यापाठोपाठ स्फोटांचे अनेक आवाज ऐकू येऊ लागले. या भागात विविध देशांचे दूतावास, विमानतळ आणि संयुक्त राष्ट्रांचे कार्यालयही आहे. जेबेल भागातील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाजवळच दोन्ही सैन्यात धुमश्चक्री सुरू आहे. तेथे ३० हजारावर नागरिकांनी आश्रय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात आश्रय घेतलेले लोकच बंडखोर किंवा बंडखोरांचे समर्थक आहेत, असा आरोप सरकारी फौजांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारचे दोन हेलिकॉप्टर जेबेल भागात बॉम्बवर्षाव करत असून लष्कर तोफांनी मारा करत आहे. बहुतांश विस्थापित नागरिक न्युएर वंशाचे आहेत.
२०१३ पासून देशात संघर्ष सुरू
दक्षिण सुदानमधील यादवी संपवण्यासाठी एक करार झाला होता. त्यानुसार बंडखोर नेते माचर हे गेल्या एप्रिल महिन्यात उपाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्यास आले होते. तेव्हापासून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या लष्करात संघर्ष सुरू आहे. डिसेंबर २०१३ मध्येही देशात यादवी युद्ध झाले होते. ते दोन वर्षे सुरू होते. या यादवीत हजारो लोकांचा बळी गेला असून २० लाखापेक्षा जास्त नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
भारत नागरिकांना परत आणणार
नवी दिल्ली - दक्षिण सुदानमधील आपल्या नागरिकांना मायदेशात आणण्याचा विचार भारत सरकार करत आहे. भारतीयांनी दक्षिण सुदानमध्ये जाऊ नये, असा सल्लाही सरकारने दिला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दक्षिण सुदानमधील घडामोडींची सरकारला जाणीव आहे. तेथून भारतीय नागरिकांना परत आणण्याची सरकारची योजना आहे. भारतीयांनी त्यासाठी तेथील भारतीय दूतावासात नोंदणी करावी. घाबरण्याचे कारण नाही.
बातम्या आणखी आहेत...