आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीतील सत्तापालट कट; ३२ हजार संशयित अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल - अमेरिकेत स्थायिक धर्मगुरू फतेउल्लाह गुलेन यांच्या समर्थकांनी १५ जुलै रोजी तुर्कीमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी ३२ हजार गुलेन समर्थकांना अटक करण्यात आली होती. या समर्थकांवर आता खटला चालवण्यात येणार असल्याचे तुर्कीच्या कायदामंत्र्यांनी सांगितले. सत्तापालटाचा कट उघड झाल्यानंतर ७० हजार लोकांची चौकशी झाल्याचे कायदामंत्री बकीर बोझदाग यांनी सांगितले. पैकी ३२ हजार गुलेन समर्थकांना कैदेत ठेवल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता बोझदाग यांनी वर्तवली.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान काही जणांची सुटका होण्याची शक्यता आहे. रेसेप तैयेप इर्दोगान यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. चौकशीनंतर अद्यापही कोर्टात सुनावणी सुरू झालेली नाही. ती कधी सुरू होणार याविषयी कोणतीही माहिती अधिकृत सूत्रांनी दिलेली नाही. तुर्कीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा खटला असेल. एका आरोपाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात अटकसत्र देशात पहिल्यांदाच झाले आहे. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने अद्याप त्यावर काम सुरू असल्याचा खुलासा करण्यात आला. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा खटला आहे. अटकेची आतापर्यंतची मोठी कारवाई आहे.
१९९९ पासून फतेउल्लाह गुलेन अमेरिकेत स्थायिक आहेत. सत्तापालटाच्या कटात आपला सहभाग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रक्रियेविषयी संभ्रम
३२हजार आरोपींवर खटला कसा चालवला जाईल याविषयी अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही, असे बोझदाग यांनी सांगितले. विविध शहरांत हे खटले चालवावे लागतील. एकाच पीठासमोर सुनावणी अशक्य असल्याचे ते म्हणाले. विशेष न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची गरज नाही. अंकारा, सीनकॅन येथेही सुनावणी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
बातम्या आणखी आहेत...