जलालाबाद - अफगाणिस्तानातील पूर्वेकडील जलालाबाद शहर शनिवारी आत्मघाती हल्ल्याने हादरले. त्यात ३३ जण ठार, तर १०० जखमी झाले. अफगाण बँकेजवळ ही घटना घडली. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, इस्लामिक स्टेटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सरकारी कर्मचारी आणि नागरिकांनी
आपल्या वेतनासाठी बँकेत गर्दी केली होती. त्याच वेळी हा हल्ला झाला. बँक कार्यालयाच्या बाहेर हा हल्ला झाला. मृतांचा आकडा ३३ वर पोहोचल्याची माहिती सरकारी रुग्णालयाचे डॉ. कामावाल यांनी दिली. अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे. शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत पाहायला मिळू लागल्या आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्येदेखील दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात मृतांचा आकडा ३० हून कमी होता. जलालाबादमध्ये याच महिन्यात १० एप्रिलला नाटोच्या सैनिकांना लक्ष्य केले होते. त्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय अलीकडेच बादाखशान प्रांतातील डोंगराळ भागात १८ अफगाण सैनिकांना ठार केले होते.