आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत ६० हजारांवर व्हिसा रद्द! प्रवेशबंदीचा एकाच आठवड्यात अनेक नागरिकांना मोठा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतर अमेरिकेत ६० हजारांवर व्हिसा रद्द करण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे. ट्रम्प यांनी सात मुस्लिम राष्ट्रांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. 
 
ट्रम्प यांच्या आदेशामुळे अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या हजारो नागरिकांचा हिरमोड झाला आहे. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना तूर्त प्रवेश नाकारण्यात आला आहे. अशा व्यक्तींची नव्या नियमानुसार देशात प्रवेशाच्या वेळी अडचण होऊ शकते. त्यामुळे ६० हजारांवर लोकांना व्हिसा नाकारण्यात आला आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विल कॉक्स यांनी म्हटले आहे. वास्तविक २०१५ मध्ये अमेरिकेत १ कोटी १० लाखांवर स्थलांतरितांना व्हिसा दिले होते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, असे कॉक्स यांनी सांगितले.  

काही घटक अपवाद  
सात मुस्लिम राष्ट्रांतील नागरिकांना ९० दिवसांपर्यंत प्रवेश नाकारण्यात आलेला आहे; परंतु मुत्सद्दी, नाटो किंवा संयुक्त राष्ट्राशी मोहिमेसंबंधी व्हिसा नव्या नियमातून वगळण्यात आले आहे. अशा व्यक्तींना अमेरिकेच्या विमानाने प्रवेश करण्यास गृह खात्याची परवानगी आहे. इतर उद्देशाने येऊ इच्छिणाऱ्यांना सध्या तरी प्रवेश मिळणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. तूर्त तरी ट्रम्प यांचा आदेश जगभरात वादाचा आणि तितकाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापुढे अहवाल सादर करणार   
अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची तपासणी आणखी कडक करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेला काही धोका नसल्याची खात्री पटत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही व्यक्तीला देशात पाऊल ठेवू देणार नाही, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. त्या भूमिकेनुसार करण्यात आलेल्या आढाव्याचा अहवाल ट्रम्प यांच्यासमोर तीस दिवसांत सादर केला जाणार आहे. कोणत्या देशात अमेरिकेच्या नियमांबद्दल जागरूकता आहे किंवा नाही याबद्दलची माहिती मिळणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या आदेशामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...