आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Black Money : स्विक बँकेत खाते, यश बिर्ला यांच्यासह ७ नवी नावे उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योगपती यश बिर्ला - Divya Marathi
उद्योगपती यश बिर्ला
बर्न (स्वित्झर्लंड) - काळ्या पैशांवरून देशात चर्चा सुरु असतानाच स्विस बँकेत खाती असलेल्या आणखी सात भारतीयांची नावे उघड झाली आहेत. त्यामध्ये उद्योगपती यश बिर्ला, दिवंगत दारू व्यावसायिक पाँटी चढ्ढाचे जावई गुरजितसिंह कोचर आणि दिल्लीच्या उद्योगपती रितिका शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.
मुंबईतील सिटी लिमोझिन घोटाळ्यात सहभागी असलेल्या सईद महंमद मसूद व सी. कौसर महंमद यांच्याशिवाय मुंबईच्याच स्नेहलता आणि संगीता साहनी यांचेही त्यात नाव आहे.

भारत सरकारने या सर्वांबाबत कर चुकवेगिरीशी संबंधित सहकार्य करारान्वये माहिती मागितली होती. त्यानंतर गॅझेटमध्ये त्यांची नावे छापून स्विस सरकारने त्यांना अपिलाची एक संधी दिली आहे. भारत सरकारला आपली माहिती मिळू नये अशी या सर्वांची इच्छा असेल तर त्यांना ३० दिवसांच्या आत अपील करावे लागणार आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांना ठोस पुराव द्यावे लागतील. अन्यथा त्यांची माहिती भारताला दिली जाईल.

स्विस फेडरल कर प्रशासनाने बिर्ला व ब्लेसिंग अपॅरल कंपनीच्या रितिका शर्मा यांची माहिती भारताला आधीच दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या काही वर्षांपूर्वी सईद मसूदची खाती बंदही करण्यात आली होती.
या महिन्यात ४० अंतिम नोटिसा जारी
स्विस सरकारने या महिन्यात आतापर्यंत ४० अंतिम नोटिसा जारी केल्या आहेत. त्यात जर्मनीचे पहिले चान्सलर अम्पायर ओत्तो वॉन बिस्मार्क यांचे वंशज फ्रांसिस्को जोस ओर्तिज वोन बिस्मार्क यांचेही नाव आहे. गॅझेटमध्ये शर्मा आणि बिर्लांचा पत्ता देण्यात आला आहे. मात्र अन्य भारतीयांची केवळ नावे आणि जन्मतारखा देण्यात आल्या आहेत. ब्रिटश, स्पॅनिश आणि रशियन नागरिकांची नावेही अशीच जारी झाली आहेत. मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या नागरिकांचे केवळ पहिले नाव आणि जन्मतारीख सांगण्यात आली आहे.

संसदेत कठोर शिक्षेचा कायदा मंजूर
भारताच्या संसदेने काळ्या पैशाबाबत नुकताच नवीन कायदा मंजूर केला आहे. त्यात विदेशात अवैधरीत्या काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १२० टक्के कर व दंडाची तरतूद आहे. मात्र असा पैसा जाहीर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात असा पैसा जाहीर केला तर ३० टक्के कर आणि ३० टक्केच दंड द्यावा लागेल.

वैयक्तिक खाते नाही : यश बिर्ला समूह
स्विस बँकेतील खात्याबाबत यश बिर्लांचे नाव पहिल्यांदाच समोर आलेले नाही. एचएसबीसीकडून मिळालेल्या यादीतही त्यांचे नाव होते. तेव्हा त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता. आता मात्र यश बिर्ला समूहाने ई-मेलद्वारे खुलासा केला आहे. ‘यश बिर्लांचे वैयक्तिक स्विस खाते नाही. बँकेने तसे लेखीही दिले आहे. भारतीय कर अधिकाऱ्यांनाही तसे कळवले आहे,’ असे त्यात म्हटले आहे. रितिका शर्मांनी कोणताही खुलासा केलेला नाही. कोचर देशाबाहेर आहेत. त्यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभाग आणि अन्य संस्था चौकशी करत आहेत.

काळ्या पैसेवाल्यांचा पर्दाफाश होईल : जेटली
अहमदाबाद । केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अहमदाबादेत स्विस सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विदेशात अवैध संपत्ती ठेवणाऱ्यांचा पर्दाफाश होईल, असे मी वारंवार सांगत आलो आहे. विदेशात संपत्ती असणाऱ्यांसाठी स्विस सरकारचे हे पाऊल सज्जड इशारा आहे, असे जेटली म्हणाले. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच स्विस सरकारने हे पाऊल उचलले याचा विशेष आनंद होत असल्याचेही जेटली यांनी नमूद केले.